मंत्री विखेंसमोरच ‘छात्र भारती ‘च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, संगमनेरमध्ये संतापाची लाट

जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नीतेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावे, या मागणीचे निवेदन देणारे ‘छात्र भारती’चे कार्यकर्ते अनिकेत घुले यांना मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, यावेळी संगमनेरचे आमदार आणि त्यांचे समर्थकही उपस्थित होते.

मंत्री राधाकृष्ण विखे हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असताना संगमनेर ‘छात्र भारती’च्या वतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत घुले व इतर विद्यार्थी आले होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनिकेत घुले व त्याच्या सहकाऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर गचांडी धरून जोरदार मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना मंत्री विखे आणि आमदार यांनी बघ्याची भूमिका घेत भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अडविले नाही.

या घटनेनंतर अनिकेत घुले व त्याचे सर्व सहकारी पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या या गुंडांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, प्रशासनाने राजकीय दबावामुळे टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी ठिय्या मांडला.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो व व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, नावानिशी तक्रार दाखल करावी, अशी मागणी छात्र भारती संघटनेने केली आहे. ‘हे सर्व पदाधिकारी मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे समर्थक अमोल खताळ यांच्याबरोबर दिवसभर शासकीय अधिकाऱ्यांसमवेत फिरत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासन त्यांचे संरक्षण करीत आहे. हा कुठला न्याय आहे?’ असा सवाल अनिकेत घुले यांनी केला.

संगमनेरमध्ये संतापाची लाट

प्रत्यक्ष मंत्री व त्यांचा समर्थक आमदार संगमनेरमध्ये उपस्थित असताना भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना जोरदार मारहाण केली. हे अत्यंत निंदनीय असून, याचे फोटो, व्हिडीओ संगमनेर तालुक्यात व्हायरल झाल्याने संगमनेरमधील पोलीस प्रशासन आणि कायदा-व्यवस्थेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी दडपशाही संगमनेरमध्ये कधीही नव्हती. त्यामुळे तालुक्यात सत्ताधाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.