युवाशक्तीच देशाला विकासाच्या मार्गावर नेईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आयोजित युवकांच्या संवाद कार्यक्रमात सांगितले. परंतु, देशात तरुणच मोठय़ा संख्येने बेरोजगार होत असल्याचे समोर आले आहे. छत्तीसगडमध्ये तब्बल 3 हजार शिक्षकांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळे या संतापलेल्या शिक्षक तरुणींनी अक्षरशः रस्त्यावर झोपून सरकारला साक्षात दंडवत घालत न्यायाची मागणी केली; परंतु त्यांचा आवाज अजूनही मोदी सरकारपर्यंत पोहोचलेला नसून सरकारने तरुणांची कशाप्रकारे दुर्दशा केली आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे, अशा शब्दांत काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
देशातील तरुणांचे भविष्य अंधारात
आज प्रत्येक राज्यातील तरुण भाजपच्या भ्रष्टाचार आणि बेरोजगारीविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. भाजपने तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले आहे, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला आहे. तर काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेरोजगारी वाढलेली असताना निर्लज्ज सरकार युवा महोत्सव साजरा करण्याचे ढोंग करत आहे, असा आरोप केला आहे.
सरकारच्या संवेदनहीनतेचा पुरावा -काँग्रेस
छत्तीसगडमधील व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने हा भाजप सरकारच्या संवेदनहीनतेचा आणि तरुणांच्या दुर्दशेचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. कडाक्याच्या थंडीत तरुण शिक्षक रस्त्यावर दंडवत घालत न्यायासाठी आक्रोश करत आहेत. परंतु, त्यांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहोचत नाही. हा भाजपाचा तरुणविरोधी चेहरा असून सरकारकडून रोजगार देण्याची खोटी आश्वासने दिली जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.