छत्तीसगडमध्ये हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर, दंडवत मोर्चा काढून मागितला न्याय

छत्तीसगडमध्ये 2 हजार 897 सहायक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. 2018 साली एनसीटीईच्या नियमानुसार यांची भरती झाली होती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे या शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपली नोकरी वाचवण्यासाठी या शिक्षकांनी आंदोलन सुरु केले असून सरकारकडे न्याय मागितला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक शिक्षकांना निलंबीत करण्यात आले होते. त्यामुळे या शिक्षिकांनी रायपूरमध्ये अनोखे आंदोलन केले. या शिक्षिकांनी माना चौकापासून ते शदाणी दरबार पर्यंत दंडवत यात्रा काढली. रस्त्यावर लोटांगण घालून शिक्षिकांनी आपला निषेध नोंदवला.

या शिक्षकांनी गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले आहे. याच आंदोलनात त्यांनी दंडवत यात्रा काढली आहे. आमचे कुटुंब आमच्यावर अवलंबून आहेत, आम्हाल न्याय द्या अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.