
दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्नही केले. कुटुंबातील सदस्यांनी हे लग्न स्वीकारलचं नाही तर सुनेचे भव्य स्वागतही केले. मध्य प्रदेशातील छतरपूरमधील हे एक प्रकरण समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुासर, मध्य प्रदेशच्या छतरपुरमधील दौरिया गावातील हे प्रकरण आहे. येथे दोन मैत्रिणींनी समाजातील परंपरा मोडत लग्न केले. सोमन यादव (24) आणि मानसी अशी या दोन मुलींची नावे आहेत. सोनम ही मूळची दौरियाची असून मानसी मणिपूरची रहिवासी आहे. या दोघींची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती.
सोनमला नेहमीच मुलांप्रमाणे राहायला आवडायचे. याचदरम्यान तिची फेसबुकवर मानसीसोबत ओळख झाली. आधी ओळख झाली, नंतर संभाषण वाढले आणि मग मैत्री झाली. यानंतर हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यामुळे समाजाचा तसेच कुटुंबीयांचा विचार न करता या दोघींनीही एकत्र आयुष्य घालवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मानसी लग्नासाठी मणिपूरवरून दौरियाला आली. यानंतर मानसी आणि सोनमने आधी कोर्टात जाऊन लग्न केलं. मग मंदिरात जाऊनही देवाच्या साक्षीने लग्न केलं. यानंतर सोनम मानसीला घेऊन तिच्या घरी गेली. यावेळी सोनमच्या घरच्यांनी या दोघींचेही स्वागत केले. या गृहप्रवेशाचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.