शरद पवारांसोबतच्या भेटीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी सकाळी अचानक पवारांच्या भेट घेतली. ते सिल्व्हर ओक येथे दाखल झाले होते. भुजबळ अचानक शरद पवार यांना भेट घेण्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भुजबळ यांनी शरद पवारांना भेटण्यासाठी वेळ घेतली होती का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ‘नाही, आज पवारसाहेबांकडे सकाळी गेलो होतो. अर्थात त्यांची काही अपॉइन्मेंट वगैरे घेतली नव्हती. फक्त ते घरी आहेत एवढं मला कळलं होतं. साधारण सव्वा दहा वाजता मी गेलो. ते घरी झोपले होते. त्यांची तब्बेत बरी नव्हती. त्यामुळे मी थोडं थांबलो. ते उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ते बिछाण्यावरच होते. साधारण आम्ही दीड तास विविध विषयावर चर्चा केली’.

यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालं नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. मी काही राजकारण घेऊन गेलो नाही, मंत्री म्हणून नाही, आमदार म्हणून आलेलो नाही. कुठली पक्षीय भूमिका माझी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हा राजकारणाचा विषय नाही. सभागृहात जे झालं ते मी बोललो. मला ना राजकारणाची पर्वा आहे, ना मंत्री पदाची ना आमदारकीची राज्य शांत राहिलं पाहिजे गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्याप्रमाणे मी ओपनमध्ये सुद्धा बोलतो आणि साहेबांसोबत बोलतो. यासंदर्भात आणखी कुणाला भेटावं लागलं तर मी त्यांनाही भेटेन असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. असं करताना मला कुणाच्या घरी जायला, कुणाची विनंती करायला मला जराही कमीपणा वाटणार नाही, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

आम्हाला काही माहिती नाही की, जरांगेंकडे तुमचे मंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली, आश्वासनं दिली ते आम्हाला माहित नाही. जरांगेंना जे मंत्री भेटले ते त्यांना काय म्हणाले, त्यांनी काय सांगितलं ते आम्हाला माहित नाही, असं शरद पवार म्हणाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

त्यावर ‘तुम्ही मंत्री, मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही’, असं उत्तर भुजबळांनी दिलं. त्यानंतर शरद पवार म्हणाले की तुमची काय चर्चा झाली तेच आम्हाला माहित नाही. त्यामुळे मी एक दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि काही लोकं एकत्र बसून काय झालं, काय होतंय, काय पाहिजे आणि कशाप्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे’, असं शरद पवार म्हणाल्याचे भुजबळ म्हणाले.

मी घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली, मी शरद पवार यांना भेटण्यासाठी चाललो आहे असं त्यांना सांगितल्याचं भुजबळ म्हणाले.