हिंमत असेल तर जरांगेंनी निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, छगन भुजबळ यांचे आव्हान

विधानसभेला 288 उमेदवार उभे करण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी मैदानात यावे व निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, असे खुले आव्हान ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. यावर राजकीय पक्षाने देखील भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान देत ओबीसींवर उठणाऱ्यांना सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

सांगली येथील ओबीसींचा एल्गार मेळाव्याला मार्गदर्शन करताना छगन भुजबळ बोलत होते. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे माजी महापौर संगीता खोत आदी उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले, राज्यात सगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ओबीसी नेत्यांची घरे, हॉटेल पह्डणे चुकीचे आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही; पण ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये. मनोज जरांगे-पाटील यांनी पुणबी म्हणून आरक्षण घेतले. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व आम्ही करतो. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे, पण आरक्षण केवळ 27 टक्के दिले जाते. मग मी आरक्षण खाल्ले असा आरोप जरांगे कसा करतात? असा सवाल भुजबळ यांनी केला.