अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकमधून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर येथून मिंधे गटाच्या हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले. त्यानंतर छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचे वृत्त धडकले. मात्र अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि बारामती लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असून ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या वावड्या उठल्या. यावर आता स्वत: छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले. “नाराजीच्या चर्चा सर्व अफवा असून मी अजितदादांसोबत नाही, राष्ट्रवादीसोबत आहे”, असे गोलमटोल उत्तर छगन भुजबळ यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, “विधानसभेआधी किंवा त्यानंतरतही मी कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीसोबत कायम राहणार आहे. तसेच मी नाराज असून दुसऱ्यांना नेत्यांची भेट घेतली. यात कोणतेही तथ्य नाही. मला जर कुणाला भेटायचे असेल तर मी उघडपणे भेटेन.”
…तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजितदादा गट आणि भाजपामध्ये जुंपली
“नाराजीच्या चर्चा साफ खोट्या असून राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होत असतो, पण लागलीच दुसऱ्या दिवशी कामालाही लागतो”, असेही भुजबळ म्हणाले.
“कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीही नाराज असतील, शरद पवारही नाराज असती, देवेंद्र फडणवीसही नाराज असतील, बारामतीची जागा का गेली? हा विचार करत अजित पवारही नाराज असतील. पण नाराजीनंतरही ज्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले, तसे मी देखील कामाला लागलो आहे. मी नाराजही नाही आणि कुणाला भेटलोही नाही”, असेही भुजबळ म्हणाले.