
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितपणे परिणाम होईल. त्यामुळे शिवसेनेची शक्ती वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
हे दोन्ही स्वतंत्र पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांची राज्यात ओळख आहे. ते एकत्र आले तर शक्ती का वाढणार नाही, असा सवाल त्यांना प्रश्नकर्त्या पत्रकारांना केला. साधे कार्यकर्ते पक्षात आले तर पक्षाची शक्ती वाढते. मग दोन मोठे नेते एकत्र आल्यावर पक्ष निश्चितच बळकट होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना ठाकरे गटाबरोबर युती करण्याबाबत सूचक विधान केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
या दोन नेत्यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेचे भुजबळ यांनी स्वागत केले. माझ्यासारखा जुन्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱया नेत्याला दोन ठाकरे एकत्र आल्यास विशेष आनंद होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
माझा पक्ष वेगळा असला आणि आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलेलो असलो तरी शिवसेनेबाबतचे प्रेम कमी झालेले नाही. सर्वच कुटुंब एकत्र आले तर फार बरे होईल. – छगन भुजबळ