रविवारी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी अनेक मोठ्या नेत्यांना डच्चू देण्यात आला. यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. याचवरून आता छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर उघड नाराजी जाहीर केली आहे. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
छगन भुजबळ म्हणाले की, ”मंत्रिमंडळ करत असताना जुने आणि नवीन यांचा मेळ घालून करायचं असतं. मात्र हे जुने झालेत, द्या फेकून, असं चालत नाही. लोकसभेला मी उभा राहणार नव्हतो. मला सांगितलं उभे राहा, मी उभा राहिलो. मी एक महिन्यात संपूर्ण तयारी केली, मला वाटलं मी जिंकेल. त्यावेळीही यांनी चुप्पी साधली. त्यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मला बोलून – बोलून सांगायचे की, तुम्हाला उभं राहिलंच पाहिजे, हा मोदी आणि अमित शाहसाहेबांचा निरोप आहे. मात्र निवडणुकीत एक महिना झाला तरी त्यांनी माझं नाव जाहीर केलं नाही. नंतर मी माघार घेतली. पुढे राज्यसभेचा दोन सीट्स निघाल्या, सुमित्राताईंना त्यातली एक जागा दिली. दुसरी जागा नितीन पाटील यांना दिली. का दिली? तर ते म्हणाले नितीन पाटील यांना मी खासदार करेन म्हणून शब्द दिला होता. ही काय पद्धत आहे? मी राज्यसभेवर गेलो असतो तर पक्षाला फायदा झाला असता.”
मंत्रिपदाची वेळ आली तर ते (अजित पवार) म्हणत आहेत की, तुम्ही आता राजीनामा द्या आणि राज्यसभेवर जा. आम्ही नितीन पाटील यांचा राजीनामा घेतो. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी नितीन पाटील यांचा राजीनामा घेत आहेत. यासाठी तुम्ही मला लहान मुलांसारखं खेवतायंत. मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? द्या म्हटलं तर देत नाही. आता नको आहे तर म्हणत आहेत कीजे, राजीनामा द्या. कारण त्यांना ती अॅडजेस्टमेंट करायची आहे. काही मानसन्मान आहे की, नाही? असा प्रश्न भुजबळ यांनी अजित पवार यांना विचारला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ”मला मंत्रिमंडळात समावेश न केल्याने ओबीसी समाज आणि माझ्या मतदारसंघातील लोक दुःखी झाले आहेत. लोक आता रस्त्यावर उतरायला लागली आहेत, म्हणून आपण त्यांच्याशी बोलायला हवं, म्हणून मी हिवाळी अधिवेशनच्या पाहिल्या दिवशी हजर राहून आता निघत आहे.”
‘…त्यामुळे मी दुःखी आहे’
ते पुढे म्हणाले, ”मंत्रिपद न दिल्याने मी नाराज नाही. माझ्याकडे अनेकवेळा अशी मंत्रिपदं आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणून सुद्धा या विधान मंडळात काम केलं आहे. एकटा शिवसेनाच आमदार (1985 ते 1990) असतानाही सगळ्यांना अंगावर घ्यायचं मी काम केलं आहे. प्रश्न हा मंत्रपदाचा नाही. मात्र ज्याप्रकारे वागणूक देऊन अपमानित केलं त्यामुळे मी दुःखी आहे.