अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पक्षांतराच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. भुजबळ अजितदादांची साथ सोडणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भुजबळ आग्रही होते. मात्र महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही. तसेच राज्यसभेवरही पाठवले नाही. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच त्यांनी मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्याचे विधान केले. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना अधिक पेव फुटले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार यांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच पक्षांतर करतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे नेते निधी मिळवतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील, असा दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्या काय होार याचा काही प्रमाणात अंदाज सर्वांनाच आला असेल. त्यामुळे केवळ भुजबळच पक्ष सोडतील असे मला वाटत नसून त्यांच्यासोबत अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदारही पक्ष सोडतील असा अंदाज सर्वांनाच आला आहे. हे लोक फक्त विधानसभेचे अधिवेशन होऊ देतील. अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील असे मला वाटतं, असेही रोहित पवार म्हणाले.
मी अजितदादांबरोबर नाही; राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे! – छगन भुजबळ