अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी करून घेतली असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीतील अपयावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मधून भाजपवर निशाणा साधण्यात आला. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावतील असे उत्तर दिले आहे.
”संघाने जशी टीका केली तशी अनेकांनी केलेली आहे. भाजपने काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतलं. आम्हालाही बरोबर घेतलंय. अशोक चव्हाण, मिलिंग देवरा यांना राज्यसभेवर पाठवलंय. ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती एकंदरीत योग्य आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ यांच्या उत्तरांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने महायुतीची पुरती धुळधाण उडवलीय. महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनही भाजपाला फायदा झाला नाही. या निवडणुकीनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मधून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य रतन शारदा यांनी भाजपाला चपराक लगावणारा एक लेख लिहिला आहे. “मोदी 3.0 : कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” या शिर्षकासह लिहिलेल्या या लेखात लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याची किंमतही भाजपाला मोजावी लागल्याचा टोला या लेखातून त्यांनी लगावला.
देशात भाजपला फटका
”महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात असंच चित्र आहे. इत ठिकाणीही भाजपला फटका बसला आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन भाजपला सत्ता स्थापन करावी लागली, असे भुजबळ म्हणाले.