Chhaava- नादखुळा!!! ‘या’ सुपरस्टार्सना पुरून उरला ‘छावा’

बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना ‘छावा’ने चांगलेच लोळवले आहे. नादखुळा परफाॅर्मन्स करत, ‘छावा’ने सलग 40 व्या दिवशी भरघोस कमाई केली. सध्याच्या घडीला छावाची देशांतर्गत कमाई ही 600 कोटींच्या पुढे आहे. चित्रपटातील अनेक संवाद आणि विक्की कौशलचा अभिनय हा जनमानसाच्या मनावर खोलवर रुजलाय. मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी कौशलचा अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट ही अशी भट्टी पुरेपूर जमून आल्यामुळेच सिनेमागृहात छावाची जादू आजही कायम आहे. तिकीटबारीवर छप्परफाड कमाई करणारा 2025 मधील ‘छावा’ हा या वर्षीचा पहिलाच सिनेमा आहे.

‘छावा’च्या आगमनामुळे त्यानंतर येणाऱ्या अनेक सिनेमांच्या तोंडचं पाणी पळालं. म्हणून जाॅन अब्राहमच्या डिप्लोमॅटने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. ‘छावा’नं शाहरुख खान, रणबीर कपूर, आमिर खान यासारख्या मोठ्या स्टार्सना हरवलंय. सर्व सूपरस्टार्ससमोर छावा आजही दिमाखाने उभा असून, या दिग्गजांना छावा अगदी पुरून उरलाय. ‘छावा’नं शाहरुख खानचा ‘पठाण’ (543.09 कोटी), रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ (553.87 कोटी), ‘गदर 2’ (525.7 कोटी) आणि आमिर खानचा ‘पीके’ (340.80 कोटी) या चित्रपटांना अवघ्या दिड महिन्यामध्येच मागे टाकले आहे. ४० दिवसांनंतरही छावा थांबण्याचं अजूनही नाव घेत नाहीये हेच चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. केवळ इतकेच नाही तर, भाषांची बंधनेही छावाने झिडकारून तेलगूच्या प्रेक्षकांनाही आपलंसं केलं.

‘छावा’ हा चित्रपट विक्की कौशलच्या आत्तापर्यंतच्या करिअर ग्राफमधलं एक वादळ आहे असंच म्हणावं लागेल. महिना उलटूनही ‘छावा’चा जलवा आजही तितकाच कायम आहे. आगामी दबंग खानचा ‘सिकंदर’ छावाचं तिकीटबारीवर घोंगावणारे वादळ रोखण्यात यशस्वी ठरेल का? याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे.