
‘छावा’ चित्रपट 14 तारखेला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच आगाऊ तिकीटविक्रीच्या माध्यमातून छावाने चांगलीच कमाई केली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने सुट्टी असल्यामुळे, छावाने पुन्हा एकदा जोरदार डरकाळी मारली. छावाच्या गल्ल्याने रेकाॅर्डब्रेक कमाई करत, पुन्हा एकदा कोटींची उड्डाणांसाठी झेप घेतली आहे. मराठ्यांचा अजेय योद्धा पडद्यावर अवतरला आणि काही दिवसांतच छत्रपती संभाजी महाराजांची ख्याती जगभरात चित्रपटातून पसरली.
सिनेमाचे बजेट 130 कोटी असताना, सिनेमाने आत्तापर्यंत हिंदुस्थानामध्ये २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. तर जगभराचा गल्ला विचारामध्ये घेतल्यास छावा आता ३०० करोडोंपार मुसंडी मारण्याच्या तयारीमध्ये आहे.
सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असून, अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका वठवली आहे. यासोबत चित्रपटामध्ये सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये आदी मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘छावा‘ बघून चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक केवळ छावाचेच गुणगान गात होता.
अभिनेता विकी कौशलने साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. तर महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना सुद्धा वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. ‘छावा‘ हिंदुस्थानासह परदेशातही प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना याने वठवलेली औरंगजेबाची भूमिकाही खूप भाव खाऊन गेली आहे. अक्षय खन्नाची भूमिका पाहून प्रेक्षकांना प्रचंड चीड येताना दिसत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये ‘छावा‘ अजून किती कोटींची उड्डाणे करणार आहे हे पाहणे आता बाकी आहे.