Chhaava- ‘छावा’च्या गर्जनेनं बाॅलीवुड दणाणलं, आगामी सिनेमांसाठी कठीणकाळ!

बाॅलीवूडमधील बहुचर्चित सिनेमांना ‘छावा’चा पंजा चांगलाच भारी पडला आहे. छावाने 18 व्या दिवशी 625 कोटींचा आकडा ओलांडत भरघोस कमाईचा उच्चांक गाठला आहे.  सकाळी 6 चा शोसुद्धा हाऊसफुल्ल असल्याने, छावाची छाप प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. सिनेमागृहात टाळ्या, शिट्या आणि शिवगर्जनांनी वातावरण चांगलेच दुमदुमले आहे. सिनेमाचे मनाचा ठाव घेणारे संवाद, विकी कौशलचा अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट ही अशी भट्टी जमून आल्यामुळेच सिनेमागृहात हाऊसफुल्लचे फलक लागले आहेत. तिकीटबारीवर छप्परफाड कमाई करणारा 2025 मधील ‘छावा’ हा या वर्षीचा पहिलाच सिनेमा आहे.

 

‘छावा’मुळे आगामी सिनेमांसाठी मात्र कठीणकाळ असणार आहे असे भाकीत आता बाॅलीवुडच्या तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. छावा चित्रपटासाठी अनेक थिएटरर्स बुक असल्याने, आगामी सिनेमांना जागा मिळणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच जाॅन अब्राहमचा आगामी सिनेमा ‘द डिप्लोमॅट’ पुढे ढकलण्यात आलेला आहे. आगामी सिनेमांना छावा कडून भीती असल्यामुळे, अनेकांनी सिनेमा पुढे ढकलण्यासाठी आता पाऊल उचलले आहे. आगामी सिनेमांची कथा पटकथा उत्तम असल्यास ते सिनेमा या छावापुढे टिकतील असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. परंतु सध्याची छावाची घोडदौड पाहता मात्र, आगामी सिनेमांसाठी रस्ता सुखकर असणे हे कठीण आहे.

अभिनेता विकी कौशलने साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. तर महाराणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना सुद्धा वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.  ‘छावा‘ हिंदुस्थानासह परदेशातही उत्तम कमाई करत आहे. 
 
सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिकेत असून, अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका वठवली आहे. यासोबत चित्रपटामध्ये सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये आदी मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘छावा‘ बघून  चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रेक्षक केवळ छावाचेच गुणगान गातोय. हेच आगामी सिनेमांसाठी कठीण बनले आहे.