
ब्लॉकब्लस्टर ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा त्यांच्या पोलादपूर तालुक्यातील मूळ गावी मोरसडेत ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला. घरच्या लोकांनी केलेल्या या गौरवाने उतेकर अक्षरशः भारावून गेले. यावेळी चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडताना उतेकर यांनी आपण सुरुवातीला पेपर टाकले, वडापाव विकले, गाड्या धुतल्या इतकेच नाही तर टॉयलेटही साफ केल्याचे सांगितले. तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच आपल्या गावातील या लेकराचा अभिमान वाटला.
पोलादपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवछत्रपती प्रतिष्ठान व व्यापाऱ्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे स्वागत केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप साबळे, शिरीष साबळे, सुनील भोसले, नामदेव शिंदे, उदय खरे उपस्थित होते. मोरसडे गावात जाताना ग्रामीण भागातही ठिकठिकाणी गावकऱ्यांनी उतेकर यांचा सत्कार केला. त्यानंतर मोरसडे येथे कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सवाद्य मिरवणूक काढत लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
प्रत्येक काम आनंदाने केले
कोणतेही काम करताना ते आनंदाने केले पाहिजे. सुरुवातीला मी पेपर टाकले, वडापाव विकले, आलिशान गाड्या स्वच्छ केल्या इतकेच नाही तर शौचालयही साफ केले. ही सर्व कामे मी मनापासून केली. ‘टपाल’, ‘लालबागची राणी’ आणि आता ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करतानादेखील मी हा ध्यास सोडला नाही. त्यामुळेच हे यश मिळाले अशी प्रांजळ कबुलीही उतेकर यांनी दिली. व्यासपीठावर श्रीकांत उतेकर, भिवा उतेकर, तुकाराम उतेकर, तुकाराम केसरकर, अनिल मालुसरे, गणपत उतेकर, चंद्रकांत केसरकर, दशरथ घाडगे, कृष्णा सणस, मुख्याध्यापक दत्तात्रेय उतेकर, सुनील शिंदे, सुभाष ढाणे, विजय दरेकर, लक्ष्मण खेडेकर तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.