पर्थ कसोटीत खणखणीत शतकी खेळी ठोकून हिंदुस्थानला संस्मरणीय विजय मिळवून देणारा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैसवाल फलंदाजीला येताच नेहमीच आक्रमक खेळाच्या प्रयत्नात असतो. त्याचे हे रुप त्याला घातक ठरतेय. त्यामुळे फलंदाजीला आल्यावर घाई करू नकोस, खेळपट्टीवर थोडावेळ थांब, असा सल्ला हिंदुस्थानचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने दिलाय.
पर्थ कसोटीत 161 धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या यशस्वीने त्यानंतर ऍडलेड आणि ब्रिस्बेन कसोटीत सर्वांची घोर निराशा केली. ऍडलेडच्या दोन्ही डावांत 0 आणि 24 धावांवर यशस्वीला बाद करण्याची किमया ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी करून दाखवली. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना यशस्वीने दोन्ही वेळेला आपली अमूल्य विकेट स्वस्तात बहाल केली. मग ब्रिस्बेनमध्येही त्याने तोच पाढा गिरवला.
अवघ्या 4 धावांवर पुन्हा एकदा तो स्टार्कचा बळी ठरला. या तिन्ही डावांत त्याची घाई त्याला नडत असल्याचे मत पुजाराने बोलून दाखवले. त्याने खेळपट्टीवर आल्यानंतर थोडावेळ घालवायला हवा. त्याने तेव्हाच शॉट खेळायला हवा, जेव्हा त्याला त्या चेंडूवर पूर्ण विश्वास असेल. पण तो पहिल्या पाच-दहा षटकांत वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करतो आणि आपली विकेट गमावतोय. तो कोणत्याही चेंडूला आपल्या बॅटच्या पट्ट्यात आणून फटकावण्याचा प्रयत्न करतोय. त्याला थोडावेळ शांत खेळ करण्याची गरज आहे.