
चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या गुणतालिकेत रसातळाला असलेल्या दोन संघांमध्ये आज 25 एप्रिलला अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. जो जिंकेल तो आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत राखेल. म्हणजेच जो जिंकणार तोच टिकणार, हे निश्चित आहे. त्यामुळे चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर क्रिकेटशौकिनांना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये स्टार खेळाडूंनी सजलेल्या या दोन्ही संघांनी आतापर्यंत फ्लॉप शो केलेला आहे. दोन्ही संघांनी 8-8 सामने खेळले असून फक्त 2-2 विजय मिळविले आहेत. चेन्नई गुणतक्त्यात अखेरच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे, तर हैदराबाद नवव्या स्थानी आहे. उभय संघांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. घरच्या मैदानावर शेर समजल्या जाणाऱया चेन्नईला यंदा मात्र आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. नूर अहमदच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला हरवून आपल्या अभियानाची जोरदार सुरुवात करणाऱया चेन्नईला विजयाची लय राखता आली नाही. त्यांना घरच्या मैदानावर लागोपाठ तीन पराभव पत्करावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध, तर चेन्नईला 103 धावाच करता आल्या. एरवी फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असलेली चेन्नईची खेळपट्टी यंदा वेगवान गोलंदाजांना मदत करत आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या खेळपट्टीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्याने चेन्नईच्या संघाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा पुन्हा खांद्यावर आलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. चेन्नईने 17 वर्षीय आयुष म्हात्रे व दक्षिण आफ्रिकेचा डे ब्रेविस यांना संघात घेऊन ताकद वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादनेही आयपीएलची धडाकेबाज सुरूवात केली होती, मात्र अतिआक्रमकता त्यांना नडली व त्यांचे पराभवामागून पराभव झाले. टॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी या वर्षी अपयशी ठरत आहे. त्यामुळे हैदराबादच्या मधल्या फळीवर दडपण येत आहे. संघाचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी त्यांनीही या अपयशाचे खापर आपल्या फलंदाजीवर फोडले आहे. फलंदाजांनी आपापली भूमिका चोखपणे वाजवायला हवी, असा इशाराही त्यांनी आपल्या खेळाडूंना दिला आहे.
उभय संभाव्य संघ
चेन्नई सुपरकिंग्ज- सेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जाडेजा, जेमी ओवरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), नूर अहमद, खलील अहमद, मथीषा पथिराना, रविचंद्रन अश्विन.
सनरायझर्स हैदराबाद – ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एहसान मलिंगा, अभिनव मनोहर.