‘अग्निबाण’ची यशस्वी भरारी; इस्रोने केले अभिनंदन

चार अयशस्वी प्रयत्नांनंतर आज श्रीहरीकोटा येथून झेपावलेल्या ‘अग्निबाण’ रॉकेटने उप-कक्षीय चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडल्यामुळे ‘अग्निकूल कॉसमॉस’ या चेन्नईस्थित खासगी स्टार्ट अप कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. उपग्रह प्रक्षेपक वाहक रॉकेट अंतराळात धाडण्याची क्षमता प्राप्त करणारी ही अंतराळ संशोधन क्षेत्रातील दुसरी भारतीय खासगी कंपनी ठरली आहे.

‘अग्निकूल’च्या स्वतःच्या प्रक्षेपण तळावरून अग्निबाण रॉकेटने आज सकाळी सव्वा सात वाजता यशस्वी झेप घेतली. या रॉकेटच्या अवकाश भरारीसाठी त्रिमितीय मुद्रण तंत्राने बनवलेल्या अर्ध क्रायोजेनिक इंजिनाचा उपयोग करण्यात आला आहे. अत्यंत कमी उपस्थितीत आणि कोणत्याही थेट प्रसारणाशिवाय आज ‘अग्निबाण सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’ (एध्rऊाअ) चे चाचणी उड्डाण करण्यात आले.

इस्रोने केले अभिनंदन

अग्निबाणचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्रोनेही अग्निकूल कॉसमॉस कंपनीचे एक्सवरून अभिनंदन केले. अर्ध-क्रायोजेनिक लिक्विड इंजिन वापरणारे हे पहिले नियंत्रित उड्डाण म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

काय आहे अग्निबाण

अग्निबाण हे दोन टप्प्यांत प्रक्षेपण प्रक्रिया पार पाडणारे प्रक्षेपक वाहन आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट 300 किलो वजनापर्यंतची सामुग्री (उपग्रह वा अन्य यंत्रणा) 700 कि.मी. अंतरावरील कक्षेत वाहून नेऊ शकेल. या रॉकेटसाठी अर्ध क्रायोजेनिक तंत्राचा उपयोग करणाऱया ‘अग्निलेट’ इंजिनमध्ये द्रवरूप ऑक्सिजन आणि एव्हिएशन टर्बाईन इंधनासह वायूरूप इंधन घटकांचे मिश्रण वापरण्यात आले आहे. प्रक्षेपण ते परत येण्यापर्यंतची प्रक्रिया हे रॉकेट फक्त दोन मिनिटांच्या कालावधीत पूर्ण करणार आहे.