चेन्नई-ओडिशातला संघर्ष टाय

चेन्नई क्विक गन्स आणि ओडिशा जगरनॉट्स यांच्यातील अल्टिमेट खो-खोतला संघर्ष 30-30 असा बरोबरीत सुटल्यानंतर मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स यांच्यातील लढतही अनपेक्षितपणे 26-26 अशी बरोबरीत सुटल्याने आजचा दिवस बरोबरीचा ठरला.

आज चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्सचा सामना 30-30 असा बरोबरीत राहिला. चेन्नई क्विक गन्सला मध्यंतराला मिळालेल्या 2 गुणांची आघाडी उपयोगी ठरली नाही. ओडिशा जगरनॉट्सने वेगवान सुरुवात करताना पहिल्या टर्नमध्ये चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या तुकडीने संरक्षण करताना 3.34 मि.ची वेळ दिली. या तुकडीतील आदर्श मोहितेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने बाद केले. सुमन बर्मन (1.07 मि. संरक्षण) व लक्ष्मण गवसने 1.25 मि. संरक्षण करताना 2 ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. त्याला महेशा पी. ने सहज स्पर्शाने बाद केले, तर दुसऱया तुकडीतील विजय शिंदे व मदनाला दिलीप खान्दाविणे बाद केले, मात्र रामजी कश्यप शेवटपर्यंत नाबाद राहत ड्रीम रन्सचा 1 गुण मिळवून दिला. या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सने 10 तर चेन्नई क्विक गन्सने 3 असे गुण नोंदवले.

दुसर्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी 2.06 मिनिटांत बाद झाली. दिलीप खांडवीला आकाशीय सूर मारत सचिन भार्गवने बाद केले, तर रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत गौतम एम. के. ला घराचा रस्ता दाखवला. नंतर विशालला सूरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केले. दुसऱया तुकडीतील ओंकार सोनवणेला पुन्हा एकदा सूरज लांडेने आकाशीय सूर मारत बाद केले. त्यच्या पाठोपाठ दीपेश मोरेला (1.11 मि. संरक्षण) लक्ष्मण गवसने सहज स्पर्शाने बाद केले तर बी. निखिलने (1.15 मि. संरक्षण) 3 ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. त्याला आदित्य कुदळेने सहज स्पर्शाने बाद केले.

मध्यंतरानंतर तिसऱया टर्नमध्ये चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी जवळजवळ 2.20 मि. बाद झाली. त्यात सचिन भार्गव व सूरज लांडे लवकर बाद झाले. त्यांना अनुक्रमे आकाश मंडल व पी. महेशाने बाद केले. त्यानंतर आदित्य कुदळेला आकाशीय सूर मारत मनोज पाटीलने डीआरएस घेत बाद केले.