5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढला; आजीची घालमेल, पालकांच्या काळजाचा ठोका चुकला अन्…

धड नीट बोलतानाही न येणारा एक 5 वर्षाचा चिमुरडा चुकून बसमध्ये चढतो. बस सुरू होते. काही अंतरावर गेल्या मुलाला रडू कोसळले आणि बसमध्ये एकच गोंधळ उडतो. इकडे मुलगा हरवला म्हणून आजीची घालमेल चालू असते, पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे अवघ्या 40 मिनिटात मुलाची आणि कुटुंबीयांची भेट होते. एकदम फिल्मी वाटणारी ही घटना तामिळनाडूमध्ये घडलीय आहे.

तामिळनाडूतील चेन्नई शहरातील तांबरम पूर्व रेल्वे स्थानकाजवळ एक मुलगा चुकून 31जी मार्गावरील एमटीसीच्या बसमध्ये चढला. इतर प्रवासीही चढले, चालकाने बस सुरू केली आणि प्रवास सुरू झाला. बरेच अंतर पुढे गेल्यानंतर बसमध्ये एक चिमुरडा चुकून चढल्याचे लक्षात येताच चालक थिरू वीरामानी यांनी एमटीसीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

चालकाचा फोन येताच तांबरम पूर्व रेल्वे स्थानकावर जाऊन एमटीसीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या पालकांचा शोध सुरू केला. यादरम्यान एक वयोवृद्ध स्त्री कावरीबावरी होऊन मुलाचा शोध घेताना आढळली. तिच्याकडून मुलाचा सर्व तपशील घेतल्यावर एमटीसीच्या कर्मचाऱ्यांनी बस चालकाशी संपर्क साधला आणि त्याला तांबरम कॅम्प रोडवर बस थांबवण्याची सूचना केली.

आपला मुलगा सुखरुप असल्याचे कळताच कुटुंबीयांच्या जीवात जीव आला. एमटीसीच्या कर्मचाऱ्यांसह कुटुंबाने सदर ठिकाणी धाव घेतली आि सेलायूर पोलिसांच्या उपस्थितीत मुलाचा ताबा घेतला. यावेळी बसचालक वीरामान आणि वाहक सिंगाई बूपाथी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वांनी कौतुक केले.

दरम्यान, एमटीसीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या घटनेची माहिती दिली असून कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कचे कौतुक केले. तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी एमटीसी कटिबद्ध असल्याचेही म्हटले.