5 कोटींचा लॉस, चेन्नईच्या डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांसह जीवन संपवले

चेन्नईमध्ये एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 5 कोटींचे नुकसान आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळे टोकाच पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांचा ड्रायव्हर जेव्हा सकाळी घरी आला, तेव्हा त्याने दरवाजा ठोकवून डॉक्टरांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. परंतु घरातून कोणतीच प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे त्याने शेजाऱ्यांना याची कल्पना दिली आणि त्यानंतर घराच्या खिडकीतून आतमध्ये पाहिलं असता त्यांना मृतदेह आढळून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी किलपॉक मेडिकल कॉलेज (KMS) रुग्णालायत पाठवण्यात आले आहेत.

मृतांमध्ये डॉ. बालमुरुगन त्यांची पत्नी सुमती ज्या वकील आहेत आणि दशवंत (17 वय) आणि लिंगेश (15 वय) या दोन मुलांचा समावेश आहे. डॉ. बालमुरुगन यांचे चेन्नईमध्ये एक अल्ट्रासाऊंड डायग्नोस्टिक सेंटर होते. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.