दिल्ली-श्रीनगर वंदे भारतमध्ये ‘ब्रेक’, कटरा स्टेशनमध्ये बदलावी लागेल ट्रेन; चिनाब रेल्वे पुलाचे 19 एप्रिलला उद्घाटन

उधमपूर येथील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे म्हणजेच चिनाब पुलाचे उद्घाटन येत्या 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. याचवेळी पंतप्रधान जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कश्मीरला जाण्यासाठी पहिली वंदे भारत एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर यादरम्यान धावणार आहे. परंतु, ही ट्रेन थेट दिल्लीहून श्रीनगरला जाणार नाही. प्रवाशांना दिल्ली ते श्रीनगर अशी तिकिटे दिली जातील. परंतु, कटरा स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना दुसरी गाडी बदलावी लागेल. या ठिकाणी प्रवाशांची सुरक्षा तपासणी केली जाईल. यासाठी किमान दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे, असे उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांसाठी कटरा रेल्वे स्टेशनवर एक स्वतंत्र लाउंज बांधण्यात येत आहे. हे स्टेशनच्या बाहेर असणार आहे. कटरा स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांना स्टेशनच्या बाहेर यावे लागेल. त्यानंतर त्यांची लाउंजमध्ये सुरक्षा तपासणी केली जाईल. ओळखपत्र पडताळणी केली जाईल. प्रवाशांच्या सामानांची स्कॅनिंग केली जाईल. यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलदेखील तैनात केले जातील. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना पुन्हा स्टेशनवर यावे लागेल. त्यानंतर श्रीनगरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वात उंच पूल

कटरा-श्रीनगर दरम्यान चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सर्वात उंच पुलावरून वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी 25 जानेवारी रोजी घेण्यात आली. ही गाडी सकाळी 8 वाजता कटरा रेल्वे स्टेशनहून निघाली आणि कश्मीरमधील शेवटचे स्टेशन असलेल्या श्रीनगरला सकाळी 11 वाजता पोहोचली. म्हणजे 160 किलोमीटरचा प्रवास 3 तासांत पूर्ण केला. ट्रेनच्या इंजिनमध्ये बर्फ जमा होण्याची शक्यता नाही. हायटेक ट्रेन कश्मीरच्या बर्फाळ प्रदेशातून सहज प्रवास करू शकेल. या ट्रेनमध्ये विमान प्रवासासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.