पूर्व चीनमधील जिआंगसूची राजधानी असलेल्या नानजिंगमध्ये यांगत्से नदी आहे. या नदीवर एक पूल आहे. मात्र या नदीवर अनेकदा आयुष्याला कंटाळलेली, नैराश्यात असलेली माणसे अनेकदा जीव देण्यासाठी येतात. मात्र अशा लोकांना यापासून परावृत्त करण्यासाठी एक देवदूत आहे. ज्याला नानजिंगचा देवदूत असे म्हटले जाते.
छप्पन वर्षीय चेन सी हा स्वयंसेवक असून त्याने गेल्या 21 वर्षांच्या कालावधीत 469 लोकांना पुलावरून उडी मारण्यापासून थांबवले आहे. नदीवरील पुलावर चेन सी लक्ष ठेवून असतात. पुलावर जास्त वेळ रेंगाळणाऱ्या किंवा कुणी नैराश्यात असल्याचे दिसल्यास ते त्यांच्यासोबत बोलून त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा उडी मारण्याकरीता पुलाच्या टोकावर उभे असलेल्यांना मागे खेचून त्यांचा जीव वाचवला आहे, तर तो पोहचण्यापूर्वी नदीत उडी मारलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे.
चेन सी लाल रंगाचा गणवेश परिधान करतो. त्या गणवेशावर “चेरीश लाईफ एव्हरी डे” म्हणजेच प्रत्येक दिवस आनंदाने जगा असा संदेश लिहिलेला असतो. चेन दिवसातून 10 वेळा पुलावर गस्त घालत असतो. 2000 सालामध्ये चेनने एका मुलीला पुलावर निराश असलेले पाहिले. त्यावेळी त्याने तिची विचारपूस केली. तिने पैशांची कमतरता असल्याच्या नैराश्यामुळे असे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चेनला सांगितले. यानंतर चेनने तिला खायला प्यायला दिले. ती थोडी शांत झाल्यानंतर तिला घरी जाण्याकरीता टिकीट काढून दिले, व घरी पाठविले. कुणाचा तरी जीव वाचवण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. या अनुभवानंतर आपण लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत करू शकतो असे त्याला जाणवले.
गेल्या सप्टेंबरपासून चेनने शेकडो लोकांना वाचवले आहे. तो लोकांचे हावभाव वाचायला शिकला आहे. अंतर्गत संघर्ष सुरू असलेल्या व्यक्तींच्या शारिरीक हालचाली वेगळ्या जाणवतात. त्यांचे शरीर जड दिसते, डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसून येते. अशा लोकांना चेन एकच सांगतो जोपर्यंत तुम्हाला तुमचे आयुष्य पुन्हा सुरू करण्याची संधी आहे, त्यामुळे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी पुन्हा विचार करा. अशा पद्धतीने तो लोकांना धीर देऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.