भटक्या श्वानाच्या डोळय़ात केमिकल; महिलेविरोधात गुन्हा

सोसायटीच्या आवारात फिरणाऱया एका भटक्या श्वानाच्या डोळय़ात केमिकल टाकून त्याचा डोळा निकामी केल्याचे समोर आले आहे. याबाबत श्वानाची देखभाल करणाऱया शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडुपच्या गगनगिरी सोसायटीच्या परिसरात तक्रारदार शिक्षिका राहत असून इमारतीच्या आवारात फिरणाऱया एका भटक्या श्वानाला त्या खाऊपिऊ घालतात. त्यांनी श्वानाचे लसीकरणदेखील केले असून त्याला सोसायटी परिसरातून काढू नये अशी पालिकेची परवानगीदेखील मिळवली आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी त्या राणी नावाच्या श्वानाला जेवण देत असताना श्वानाच्या डोळय़ातून रक्त येत असल्याचे आढळून आले. तिने तत्काळ त्या श्वानाला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. यावेळी त्याच्या डोळय़ात काहीतरी केमिकल गेले असून त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला असल्याचे डॉक्टरांकडून शिक्षिकेला सांगण्यात आले.

दरम्यान, त्यानंतरदेखील या श्वानाच्या डोळय़ातून अनेकदा रक्त येत होते. याचदरम्यान सोसायटीतच राहणारी एक महिला राणीच्या अंगावर काही तरी फेकत असल्याचे  शिक्षिकेच्या मुलीने पाहिले होते. त्यानंतर शिक्षिकेने सीसीटीव्ही तपासले तेव्हा ती महिला श्वानाच्या डोळय़ात काहीतरी केमिकल फेकत असल्याचे आढळून आले.  हेच राणीचा डोळा निकामी होण्यामागचे कारण असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  भांडुप पोलिसांनीदेखील याबाबत महिलेवर गुन्हा दाखल केला.