हिरवा पाऊस, निळा नाला, गुलाबी रस्त्यानंतर आता वाहनांवर काळे डाग; डोंबिवली एमआयडीसीतील प्रदूषणाने नागरिक धास्तावले

कधी हिरवा पाऊस तर कधी निळा नाला, हे कमी म्हणून की काय गुलाबी रस्ते या प्रदूषणाच्या समस्येसाठी डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. आज तर अचानक पावसात गारा पडाव्यात त्याप्रमाणे हवेतून वाहने, शेड, नागरिकांच्या अंगाखांद्यावर केमिकलचे काळे ठिपके पडत होते. हे काळे डाग पाहून डोंबिवली एमआयडीसीमधील मिलापनगरवासीय धास्तावले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिपक्यांचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतर यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील धोकादायक रासायनिक कारखान्यांमुळे नागरिक हैराण आहेत. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. रासायनिक सांडपाणी, उग्र वास यामुळे एमआयडीसी परिसरातील नागरिक रोजच हैराण असतात. यातच आज नवीनच समस्या नागरिकांसाठी डोकेदुखीची ठरली. दुपारी अचानक मिलापनगर, एम्स हॉस्पिटल परिसरात गाड्यांवर दुकाने, शेड तसेच नागरिकांच्या कपड्यांवर हवेतून काळया रंगाचे ठिपके पडू लागले, यामुळे नागरिक धास्तावले.

वाहने धुऊनदेखील हे काळे ठिपके जात नसल्याने रासायनिक प्रदूषणाच्या शंकेने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबतची माहिती दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिपक्यांचे नमुने घेतले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या मागचे नेमके कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केमिकल लोचा की आणखी काही?
हवेत पडणाऱ्या काळ्या ठिपक्यांच्या केमिकल लोचामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला. काळ्या ठिपक्याच्या उग्र वासामुळे डोके दुखणे, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नागरिकांची आहे.