चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनी येथे आगीत होरपळून गुप्ता कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली असून संबंधित कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीने आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले.
शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तसेच दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रशासनाकडून तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. विभागप्रमुख प्रमोद शिंदे, आमदार प्रकाश फातर्पेकर, अनिल पाटणकर, श्रीकांत शेटये, संजय नटे, किरण लोहार, शेखर चव्हाण, उमेश करकेरा आदी यावेळी उपस्थित होते.
रहिवाशांनी मानले आभार
आजूबाजूच्या घरांचे सिमेंटचे पत्रे हटवून दुर्घटना झालेल्या घरामधील व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आजूबाजूच्या घरांतील पत्र्याचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यात या रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जितके पत्रे लागतील तितके पत्रे उपविभागप्रमुख अरुण हुले यांनी ताबडतोब उपलब्ध करून दिले. त्यामुळे रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले.