चेंबूरमध्ये खड्यात पडून एकाचा मृत्यू; कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल

चेंबूरमध्ये मलनिःसारण वाहिनीसाठी खोदलेल्या 52 फूट खोल खड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चेंबूरच्या टिळकनगर परिसरात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. दरम्यान, टिळकनगर पोलिसांनी खड्डय़ाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील इमारत क्रमांक 43 येथे गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी 25 फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे, मात्र या खड्डय़ात कोणी पडू नये यासाठी चारही बाजूला सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. परिसरातील रहिवासी राजू दवंडे (52) यांचा पाय घसरून ते या खड्डय़ात पडले. स्थानिकांनी याची माहिती टिळकनगर पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला दिली.

पालिका कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. टिळकनगर पोलिसांनी या घटनेची नोंद करून झेड कन्स्ट्रक्शन या पंत्राटदार पंपनीच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.