
ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने त्यांच्यावर अक्षरशः रडण्याची पाळी आलेली आहे. विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाऊंट हॅकर्सने हॅक केले असून, सदर अकाऊंटवरुन हॅकर्सने अश्लील व्हिडीओ पोस्ट केले आहे. त्यामुळेच विष्णू मनोहर यांनी सायबर क्राइमकडे तसेच फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केलेली आहे.
मास्टर रेसिपी हे विष्णू मनोहर यांचे महाराष्ट्रीयन रेसिपीचे चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून रेसिपी करुन विष्णूजी महाराष्ट्रासह देशातही लोकप्रिय झालेले आहेत. विष्णू मनोहर यांच्या नावावर पाककृती करण्यासंदर्भातील अनेक रेकाॅर्ड केलेले आहेत. मास्टर रेसिपी या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते विविध प्रांतातील पाककृती या खवैय्यापर्यंत पोहोचवतात. मास्टर रेसिपी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध चवी आणि खाद्यपरंपरा यांचा अनुभव घ्यायला मिळतो. त्यामुळेच विष्णू मनोहर हे नाव घराघरामध्ये पोहोचले.
विष्णू मनोहर यांचे ‘मास्टर रेसिपी’ या नावाचे फेसबुकवर पेज असून, यावर देखील व्हिडीओ पोस्ट केले जातात. या चॅनलवर सध्याच्या घडीला चार लाख सबस्क्रायबर्स असून, याच पेजवरुन विष्णूजी पाककृती रेसिपी आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. परंतु याच पेजवर अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तब्बल दीड लाख फाॅलोवर्स कमी झाल्याचे सांगताना विष्णूजींच्या डोळ्यात अश्रू होते.
विविध भागातील खाद्यसंस्कृती तळागाळातील खवैय्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विष्णूजी सदैव प्रयत्न करत असतात. या आधी सुद्धा विष्णूजींचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा बंदोबस्त करण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु सध्याच्या घडीला मात्र हॅकर्सने अकाऊंटवरुन अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे, विष्णूजींना चांगलाच मनस्ताप झालेला आहे.