![POLICE](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/11/POLICE-696x447.jpg)
वाळूचोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना कधी जीवे मारण्याची धमकी तर कधी त्यांच्या अंगावर वाहने घालण्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत, मात्र छत्रपती संभाजीनगरात यापेक्षाही भयंकर घटना समोर आली आहे. चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडूनच वाळूची तस्करी केली जात असून, वाळूच्या हायवावर कारवाई करणाऱ्या तहसीलदारांनाच धमकावून या पोलीस कर्मचाऱ्यासह सुमारे 150 वाळूतस्करांनी राडा घातला. विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची तक्रार घेण्याऐवजी तेथील पोलीस उपनिरीक्षकाने तहसीलदारांची सरकारी जीप जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून त्या पोलीस उपनिरीक्षकासह वाळूतस्कर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री रंगलेल्या हायहोल्टेज ड्राम्यामुळे सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, अख्खे प्रशासन यामुळे सुन्न झाले आहे. वाळू माफियांकडून कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या घटना घडत आहेत, मात्र कायद्याचा रक्षक असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यानेच वाळू तस्करी सुरु करीत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असलेल्या अधिकाऱ्याला थेट आव्हान दिल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार तहसीलदार रमेश मुंडलोड सरकारी कामकाज आटोपून गुरुवारी रात्री घराकडे जात असताना त्यांना गारखेडा परिसरातील विजय चौकात वाळू वाहतूक करणारा हायवा निदर्शनास आला. त्यांनी या हायवाला थांबवून वाळू रॉयल्टी भरणा केल्याची पावती मागितली. त्यावर वाहनचालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले आणि हायवाचे मालक पोलीस कर्मचारी पवार असल्याचे सांगितले. दरम्यान, रॉयल्टी नसल्याने तहसीलदार मुंडलोड यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि हायवा जप्त करुन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तलाठी त्या हायवामध्ये बसले आणि तहसीलकडे जात असताना हडकोतील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ पोलीस कर्मचारी पवार आणि सुमारे 150 वाळू माफिया आले आणि त्यांनी हायवासह तहसीलदारांची जीप थांबविली. त्यानंतर तहसीलदार रमेश मुंडलोड यांना अरेरावी करीत ‘आपण पोलीस कर्मचारी आहोत’, असे म्हणत त्यांना शिवीगाळ करीत धमकावणे सुरु केले. हा राडा सुरु असताना तेथून हायवा पळवून नेण्यात आला. वाळूतस्कर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने नंतर तहसीलदारांना थेट ‘माझ्या विरोधात कुठल्याही पोलीस ठाण्यात जा, माझी तक्रार कुणी घेणार नाही!’ असे सांगत तालुका दंडाधिकाऱ्यांना धमकी दिली. त्यानंतर रात्री 10.30 वाजता तहसीलदारासह महसूल कर्मचाऱ्यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठले. तत्पूर्वीच ते पोलीस कर्मचारी 150 वाळू तस्करांसह येथे आलेले होते.
दरम्यान, जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांना घटनेची माहिती देत तक्रार घेण्याबाबत सांगितले, मात्र वाळूतस्कर पवार हे पोलीस कर्मचारी असल्याने त्या उपनिरीक्षकांनीही तक्रार घेण्यास चक्क नकार दिला. यावर हे पोलीस उपनिरीक्षक महाशय थांबले नाहीत. त्यांनी थेट तालुका दंडाधिकारी असलेल्या तहसीलदार मुंडलोड यांच्या जीपची चावी काढून घेत त्यांना बसवून ठेवले. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत हा ड्रामा सुरु होता. तक्रार घेत नसल्याने अखेर तहसीलदार दुचाकीवरून रात्री 1 वाजता घराकडे परतले. तत्पूर्वी त्यांनी आपली सरकारी जीपची चावी परत करण्याची वारंवार विनंती केली, मात्र त्या पोलीस निरीक्षकाने त्यांच्या जीपची चावी परत केली नाही. वाळूतस्कर पोलीस कर्मचारी आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या धाडसामुळे अख्खे महसूल प्रशासन सुन्न झाले.
दरम्यान, या घटनेनंतर तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना घटनेचा शुक्रवारी अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांशी घटनेबाबत चर्चा केली. जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि वाळू तस्कर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत पोलीस आयुक्तांकडून कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले. कारवाई न झाल्यास आपण स्वतः या प्रकरणी कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई
शुक्रवारी रात्री झालेल्या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच प्रकरणात पोलिसांवर झालेल्या आरोपांसंदर्भातही चौकशी केली जाणार असून, त्यात तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री तहसीलदारांची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या जिन्सी पोलिसांनी शनिवारी मात्र तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी वाळूचा हायवा मात्र शुक्रवारी रात्री वाळू तस्करांनी पळवून लावला होता, त्याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.