जिल्हा सत्र न्यायालयासमोरून उचलून नेलेली दुचाकी सोडविण्यासाठी 500 रुपयांची लाच घेणारे छावणी वाहतूक शाखेचे लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रामराव चव्हाण (52, रा. पोलीस कॉलनी, हडको) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुचाकी सोडविण्यासाठी नियमाप्रमाणे पावती फाडा, अशी मागणी करणाऱ्या तक्रारदारास ‘तू कोण बादशहा आहेस का?’ असे म्हणणेच लाचखोर उपनिरीक्षकाला महागात पडले.
जिल्हा सत्र न्यायालयासमोर लावण्यात आलेली दुचाकी (एमएच 20जीएफ 5702) ही छावणी वाहतूक शाखेच्या पथकाने उचलून नेली होती. ही दुचाकी घेण्यासाठी तक्रारदाराने छावणी वाहतूक शाखेचे कार्यालय गाठले. या ठिकाणी कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रामराव चव्हाण यांनी 1200 रुपयांची मागणी सोमवारी केली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार व लाचलुचपत विभागाचे पथकाने आज थेट छावणी वाहतूक शाखा गाठली. यावेळी पंचासमक्ष प्रदीप चव्हाण यांनी 700 रुपयांची मागणी केली. त्यापैकी 200 रुपयांची पावती देऊन 500 रुपये लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. कॉ. रवींद्र काळे, साईनाथ तोडकर, पोलीस अंमलदार सी. एन. बागूल यांनी रंगेहाथ पकडून लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नंबर लिहिलेली नोट कामी आली
तक्रारदाराकडून चव्हाण यांनी 700 रुपये घेतले होते. त्यापैकी 200 रुपयांची पावती दिली व टाकले. या पिशवीत 500 रुपयांच्याही अनेक नोटा होत्या. त्यामुळे लाच घेतलेली नोट कोणती? असा प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पडला. त्यामुळे हा ट्रॅप बारगळतो की काय असा प्रश्न निर्माण झाला असता तक्रारदाराने चलाखीने 500 रुपयाच्या नोटेचा लिहून घेतलेला नंबरच दाखविला. त्यामुळे ती नोट सापडली आणि चव्हाण लाचेच्या जाळ्यात अडकला.