Mahakumbh 2025: महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून संसदेत गोंधळ, विरोधकांनी दिल्या घोषणा

om-birla

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात ( Mahakumbh ) चेंगराचेंगरी झाली यावेळी 30 भाविकांचा मृत्यू झाला. हे प्रकरण संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ( budget 2025 ) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी चांगलेच लावून धरले. यावरून संतप्त खासदारांनी संसदेच्या सभागृहात प्रचंड गदारोळ घालून ‘कुंभ पे उत्तर दो’ अशा घोषणा केल्या.

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. संसदेचे कामकाज सुरू होताच, सभागृहातील विरोधी पक्षातील सदस्यांनी महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर सभागृहात चर्चा करावी, मृतांची नावे सादर करावीत, अशी मागणी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर केली. यावरून सभागृहात विरोधी पक्षातील सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी मागितली आहे. तसेच राज्य सरकारवर मृतांची खरी संख्या लपवण्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.

विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष बिर्ला यांनी संताप व्यक्त केला. देशाच्या जनतेने तुम्हाला संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे. तुम्हाला टेबल तोडण्यासाठी पाठवले आहे की चर्चेसाठी, असं बिर्ला म्हणाले. तसेच कामकाज सुरळीतपणे चालू ठेऊ देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.