माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यामध्ये भाजपच्या कार्यक्रमात एका भजनावरून मोठा वाद निमार्ण झाला आहे. येथे भाजपच्या कार्यक्रमात भोजपुरी गायिकेने महात्मा गांधीजींचं आवडतं भजन ‘रघुपती राघव राजा राम…’ गायलं. याच भजनातील ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ ही ओळ गाताच भाजप कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेही कार्यक्रमात उपस्थित होते. हे भजन गाण्यासाठी भोजपुरी गायिका देवी यांना माफी मागावी लागली आहे. याचवरुन आता विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ”अटलजींच्या जयंतीनिमित्त सरकारने पाटणा येथे ‘मैं अटल रहूंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये लोकगायिका देवी यांनी गांधीजींचे आवडते भजन ‘रघुपती राघव राजा राम’ गटाचं समोर बसलेल्या भाजप नेत्यांनी गोंधळ घातला. गांधीजींचे भजन गायल्याबद्दल या लोकगायकाला माफी मागण्यास सांगण्यात आले. आरएसएस-भाजप लोकांच्या मनात गांधीजींबद्दल किती द्वेष आहे, याचे ही घटना उदाहरण आहे. गोडसेच्या विचारसरणीचे लोक गांधीजींचा आदर करू शकत नाहीत.” हा देश गोडसेच्या नाही, तर गांधीजींच्या विचारसरणीवर चालेल, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय लालू प्रसाद यादव यांनीही एक पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. या पोस्टमध्ये लालू प्रसाद यादव म्हणाले की, ”जय सियाराम, जय सीताराम, या नावाचा आणि घोषणेचा संघी आणि भाजप लोक पहिल्यापासूनच तिरस्कार करतात. कारण ती माता सीतेची स्तुती आहे. हे लोक सुरुवातीपासूनच महिलाविरोधी आहेत आणि जय श्री रामचा नारा देऊन अर्ध्या लोकसंख्येचा, महिलांचा अपमान करतात.” ते पुढे म्हणाले, ”कालच्या कार्यक्रमात गायिका देवी यांनी बापूंच्या नावाने बांधलेल्या सभागृहात बापूंचे भजन गायले आणि ‘सीताराम’ म्हटले. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली. तसेच माता सीतेला जय सीताराम ऐवजी जय श्री रामचा नारा लागवण्यास त्यांना सांगण्यात आलं. हे संघी ‘सीता माते’सह स्त्रियांचा अपमान का करतात?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.