वृत्तनिवेदकाची चूक भोवली, ट्रम्प यांना चॅनेल देणार 127 कोटी रुपये

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानहानीच्या प्रकरणात एबीसी न्यूज चॅनेलला त्यांना 15 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 127.5 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या पैशांव्यतिरिक्त एबीसी न्यूजला निवेदनही प्रकाशित करावे लागणार आहे. कराराच्या अटींनुसार एबीसी न्यूज चॅनेल हे पैसे ट्रम्प प्रेसिडेंशियल फाऊंडेशन आणि लायब्ररीसाठी दान करणार आहे.

एबीसी न्यूजचे निवेदक जॉर्ज स्टीफनपोलस यांनी लेखिका जीन पॅरोल बलात्कारप्रकरणी ट्रम्प दोषी आढळल्याचे वक्तव्य ‘द विक’ या कार्यक्रमामध्ये केले होते. या प्रकरणी चॅनेलविरोधात ट्रम्प यांच्याकडून खटला दाखल करण्यात आला. शुक्रवारी फ्लोरिडा येथील फेडरल न्यायाधीशांसमोर समेट घडवण्याच्या दृष्टीने आदेश जारी करण्यात आला. न्यायाधीश लिसेट एम. रीड यांनी ट्रम्प व स्टेफीनोपोलस या दोघांचे जबाब नोंदवले आणि दोन्ही बाजूंनी समझौता करार केला.

लेखिका एलिझाबेथ जीन पॅरोल यांनी दाखल केलेल्या 2023 च्या खटल्यात ट्रम्प लैंगिक अत्याचारासाठी जबाबदार असल्याचे आढळले. न्यूयॉर्क कायद्यानुसार, लैंगिक अत्याचार हा बलात्कारापेक्षा वेगळा गुन्हा आहे.