चंद्रावर अनेक ठिकाणी बर्फाचे भांडार; ‘चांद्रयान 3’ने दिली महत्त्वपूर्ण माहिती

‘चांद्रयान 3’ ने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. चंद्राचा अभ्यास करताना पूर्वी काढलेल्या अनुमानापेक्षा तेथील ध्रुवांवरील पृष्ठभागाखाली अनेक ठिकाणी बर्फ असू शकतो, असे ‘चांद्रयान 3’ च्या नव्या माहितीतून समोर आले आहे. भविष्यात चंद्रावरील संशोधनाच्या दृष्टीने हे बर्फाचे भांडार उपयुक्त ठरणार आहे. अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे प्राध्यापक दुर्गा प्रसाद करनाम म्हणाले, स्थानिक तापमानातील मोठे बदल बर्फाच्या निर्मितीवर थेट परिणाम करू शकतात. बर्फाच्या कणांमधून त्यांची निर्मिती आणि इतिहासाबद्दल वेगवेगळय़ा गोष्टी समजू शकतील. ‘चांद्रयान 3’ च्या विक्रम लँडरवर तापमान मोजणीसाठी ‘चास्ते’ (द चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपरिमेंट) हे उपकरण जोडण्यात आलेले आहे. या उपकरणावर दहा वेगवेगळे तापमान सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. या अभ्यासासाठी ‘चास्ते’ उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि त्याखालील 10 सेंटिमीटर खोलीपर्यंत मोजलेल्या तापमानाचे विश्लेषण केले.