
महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून, पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तत्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या कार्यशाळेत दिला.
आजपासून दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री बोलत होते. विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, महसूल विभागाने लोकाभिमुख व पारदर्शक काम करावे. जनतेची कामे वेळेत आणि तातडीने होण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. समाजाप्रति आपले काही देणे असून, आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने काम करावे. आय. ए. एस. अधिकाऱ्यांकडे खूप मोठा अनुभव असून, त्या अनुभवाचा उपयोग विभागाला होण्याच्या दृष्टीने, त्यांनी सहभाग नोंदवावा. विभागातील विविध कामे करताना, नियमात काम असेल तरच कामे करावीत, जर काम नियमात नसेल तर संबंधितांना लेखी कळवावे. नियमात न बसणारे काम होणार नाही, याची जबाबदारी संबंधितांची असेल, त्यामुळे नियमबाह्य कामे होता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी. या कार्यशाळेनिमित्त प्रत्येक जिल्ह्याने शून्य हेरिंग (सुनावणी) संकल्प इशारा राबवून सुनावणीची प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत.
लोकांच्या अडचणी समजून घेऊन अडचणींचे तत्काळ निराकरण केले जावे. चुकीची कामे करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. सर्वांनी लोकहिताची कामे करावीत, असे सांगून बावनकुळे म्हणाले, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात येईल. त्यासाठी मी महसूल विभागाचा प्रमुख म्हणून नेहमी आपल्या पाठीशी उभा आहे.