>> चंद्रसेन टिळेकर
अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे कुणालाच सांगता येत नाही हेच अध्यात्म क्षेत्राचं आंधळेपण. अध्यात्माने आत्मिक समाधान मिळतं हेही एक फसवं वचन. ‘सारं जग आपला आत्मिक उद्धार व्हावा म्हणून भारताकडे मार्गदर्शनासाठी आशेने पाहत असते’ असा भाबडेपणा अध्यात्माच्या जोरावर टिकवू पाहणारा आपला देश जगात कोणती प्रतिमा निर्माण करत असेल, हा प्रश्न पडतोच.
जगात आमचा देश अध्यात्मवादी म्हणून समजला जातो असा आमचा आम्हीच समज करून घेतला आहे. इतकंच काय पण ‘सारं जग आपला आत्मिक उद्धार व्हावा म्हणून भारताकडे मार्गदर्शनासाठी आशेने पाहत असते’ अशी आमची आम्हीच पाठीवर थाप मारून घेतो. प्रत्यक्षात मात्र एक गरीब अन् अडाणी देश म्हणून आपली प्रतिमा आहे. याची अनेक कारणे असली तरी एक प्रमुख कारण म्हणजे आम्ही अध्यात्माला अन् अध्यात्माने आम्हाला मारलेली घट्ट मिठी!
आता या क्षणाला अध्यात्माचं दळण दळायचं कारण म्हणजे नुकतंच आमच्या पुण्यनगरीतील एका प्रमुख वृत्तपत्रात स्वतला आध्यात्मिक गुरू म्हणून मिरवणाऱया बाबाने तरुण पिढीला केलेलं आवाहन. अलीकडे आपल्या देशात एकूणच बुवाबाजीला उधाण आलं आहे. त्यामानाने आमचा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र बरा असं आपण म्हणत होतो हे खरं, पण आता तेही खोटं ठरविण्याचा निर्धार गेल्या काही वर्षांपासून उगवलेल्या बाबा, बुवांनी केलेला दिसतो. तर अशाच एका अल्पशिक्षित, परंतु उत्तम वाक्चातुर्य असलेल्या बाबाने एखादा साक्षात्कार झाल्यासारखं जाहिररित्या आवाहन केलं की, ‘युवा पिढीने अध्यात्माकडे वळावं.’ एरवी हे मुक्ताफळ एक विनोद म्हणून दुर्लक्षही केलं गेलं असतं. परंतु ते वक्तव्य नावाजलेल्या आणि चांगला खप असलेल्या नामवंत वृत्तपत्रात मोठय़ा ठळकपणे छापलं गेलं असल्याने त्याची दखल घेणं भागच आहे. जनहो, या विश्वातील सर्व देश आपापल्या देशवासियांचा, समाजाचा उद्धार विज्ञानाच्या साहाय्याने कसा करता येईल याचा ध्यास घेतलेले दिसतात.
एकेकाळी म्हणजे साधारणतः पाचशे वर्षांपूर्वी युरोप आपल्या देशापेक्षा काहीसा मागासलेलाच होता. याचं कारण म्हणजे चर्चने सामान्य माणसाला अध्यात्माच्या नावाखाली भक्तिरसात पूर्णपणे बुडवून टाकलं होतं. कुठलीही भक्ती माणसाची विचारशक्ती गोठवून टाकते. त्यामुळे चर्च सांगेल तेच अंतिम सत्य असं लोकं मानत. परंतु हळूहळू तेथील सामान्य जनांची विवेकशक्ती उमलू लागली. याचं प्रमुख कारण हे होतं की, तेथील समाजसुधारक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ हे मोठय़ा प्रमाणावर बुद्धिप्रामाण्याचा पुकार व स्वीकार करू लागले होते. बायबल या अत्यंत पवित्र अशा समजल्या गेलेल्या धर्मग्रंथात जी विचार मूल्ये मांडली होती ती तशीच्या तशी स्वीकारायला लोकांनी नकार दिला. बोल बोल म्हणता युरोपात प्रबोधन युग अवतरलं आणि तो साऱया विश्वात आज वैभवाने तळपत आहे.
या प्रबोधन युगाला ‘युरोपियन रेनेसान्स’ म्हणून गौरवलं जातं. या प्रबोधन युगानेच वैज्ञानिक क्रांतीला जन्म दिला. या वैज्ञानिक क्रांतीची फलश्रुती म्हणजे जुन्या वैद्यकीय क्षेत्राने आपली कात टाकली आणि रोग निवारक म्हणजेच जीवन संवर्धक अशी निरनिराळी औषधं निर्माण झाली. म्हणजे या पूर्वी निरनिराळ्या रोगांच्या साथीने किडय़ामुंगीसारखी मरणारी माणसं आता केवळ सुखाने जगू लागली असं नाही, तर या वैज्ञानिक क्रांतीने मानवजातीचे आयुर्मानही उंचावले. (सद्यःस्थितीला माणसाचं सरासरी आयुर्मान चाळीसवरून नव्वदीला गेलं आहे.) तेव्हा आता कदाचित अध्यात्मवाद्यांच्या दृष्टीने कटू सत्य असेल, पण त्यांना ते स्वीकारावंच लागेल. ही मानवजात तुमच्या कुठल्या अध्यात्माने वाचवली नाही तर विज्ञानाने वाचवली आहे. हेच तुमचं अध्यात्म आमच्या मानगुटीवर हजारो वर्षं बसल्यामुळे प्राचीन काळातील शास्त्रज्ञ आर्यभट्ट, अनाथ, ब्रह्मगुप्त, सुश्रुत, शरद, नागार्जुन यांनी लावलेल्या शोधाच्या पलीकडे एकही महत्त्वाचा शोध आपण लावू शकलो नाही. (शून्याचा शोध हा महत्त्वाचा एकमेव शोध) या उलट युरोपातील चिमणीएवढय़ा एकेका देशाने शेकडो शोध लावले. यामुळेच की काय ‘एक शून्य शून्य’ या आपल्या ग्रंथात पु. ल. म्हणतात, “माझ्या देशात एवढे साधू-संत होण्याऐवजी शस्त्रक्रियेच्या वेळी होणाऱया वेदना कमी करणाऱया
अॅनेस्थेशियाचा शोध लावणारा संशोधक जन्माला आला असता तर मला अधिक आनंद झाला असता.’’
अध्यात्माने आत्मिक समाधान मिळतं हेही एक फसवं वचन आहे. जेव्हा रंजनाची काहीच साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा त्याची चलती असेलही, पण आता अध्यात्मापेक्षा साहित्यिक, सांगितिक, सांस्कृतिक अशी क्षेत्रं आहेत की आपल्याला जीवनाचा निखळ आनंद घेतात. विषाची परीक्षा घ्यायची नसते. अध्यात्मालाही तेच वचन लागू पडतं.
या अध्यात्म क्षेत्राचं आंधळेपण हे आहे की अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे कुणालाच सांगता येत नाही. विज्ञानाचं तसं मुळीच नाही. निरीक्षण, परीक्षण व त्यातून निर्माण झालेलं सत्य साऱया विश्वात सारखंच असतं. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र आल्याने विशिष्ट परिस्थितीत पाणी निर्माण होणार असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही तसंच घडेल. अध्यात्माची गत हत्तीला चाचपणाऱया सात आंधळ्यांसारखी! अध्यात्माचा संबंध कुणी देवाशी लावतो, कुणी धर्मग्रंथात ते शोधतो, तर आणखी कोणी आत्म्याची उठाठेव करतो. तर अन्य कुणी वर्तमानात सुखेनैव जगायच्या ऐवजी अज्ञाताच्या अंधारात चाचपडत बसतो. काहीच जमलं नाहीतर कर्मकांडांची भातुकली आहेच भक्तीच्या नशेत जायला. जोडीला मनुस्मृती, गुरुचरित्र अशा धर्मग्रंथांचं निर्बुद्ध पारायणं आणि निष्फळ मंत्र-स्तोत्र यांची भलामण आहेच.
काही अध्यात्मवादी अध्यात्माला विज्ञानाच्या पंगतीला बसविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ‘विज्ञानावाचून अध्यात्म पांगळे अन् अध्यात्मावाचून विज्ञान आंधळे’ किंवा ‘विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं’ अशी अज्ञानमूलक वचने आपल्या तोंडावर फेकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, जिथे अध्यात्म माजतं तिथे विज्ञान रुजत नाही व जिथे विज्ञान रुजत नाही तिथे विकास फुलत नाही आणि अर्थातच जिथे विकास ठप्प होतो तो समाज, ते राष्ट्र एक तर गुलामीत तरी जातं नाहीतर त्याच्या हाती भिकेचा कटोरा तरी येतो. आपल्या देशाच्या बाबतीत दुर्दैवाने दोन्ही भोग या अध्यात्माच्या नादाने आपल्या वाटय़ाला आले आहेत.
मित्रहो, उत्तम माणूस घडविण्यासाठी अध्यात्माची मुळीच गरज नाही. नैतिक मूल्यांचं रोपण करण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र, नागरिक शास्त्र आणि प्रबोधनपर बक्कळ साहित्य उपलब्ध आहे. अध्यात्माच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा विज्ञान सूर्याच्या ज्ञानकिरणांनी उजळून जाऊ या. म्हणूनच म्हणतो, ‘अध्यात्म न लगे आम्हां!’
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)