>> चंद्रसेन टिळेकर
महाराष्ट्राला जशी समाजसुधारकांची परंपरा लाभली आहे तशी देदीप्यमान अशी संत परंपराही लाभली. या परंपरेने भक्तीचा प्रसार करताना महाराष्ट्राच्या एकूण समाज प्रबोधनालाही हातभार लावला आहे. नुकतेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेचे संतभूमी आळंदी येथे तीन दिवसांचे अधिवेशन पार पडले. अनिस संस्था संतांचेच कार्य पुढे नेत असल्याचा निर्वाळा वारकरी पंथातील तीन अध्वर्यूकडून मिळणे हे दिलासा देणारे आहे.
गुहेत किंवा झाडावर राहणाऱया आदिमानवाची उक्रांती होत होत आज तो बऱ्यापैकी सुखवस्तू झाला आहे. ज्या निसर्गाच्या कोपाच्या भीतीने तो सदैव घाबरलेला असायचा, त्याची घाबरून पूजा करायचा, त्याच निसर्गाला त्याने आता विज्ञानाच्या सहाय्याने आपल्या अंकित केले आहे. माणसाची ही प्रगती झाली ती त्याच्या चिकित्सक बुद्धीमुळे, प्रश्न विचारण्याच्या त्याच्या उर्मीतून. ही त्याची चौकस बुद्धी कोमेजू नये म्हणून पृथ्वीवरील सर्व समाजातून त्या-त्या वेळी जाणकार मंडळी दक्ष राहिलेली आहेत. समाज काळाप्रमाणे सतत प्रगत होत जावा, निरर्थकपणे जुन्याचा हव्यास न धरता सुधारणेच्या मार्गावरून त्याने चालावे म्हणून देशोदेशीच्या प्रज्ञावंतांनी खस्ता खाल्ल्या आहेत. या मंडळींमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती होत्या. एक म्हणजे नैसर्गिक शक्तीची उकल करण्यात रस घेणारे – शास्त्रज्ञ आणि दुसरे सतत काळाप्रमाणे आपल्या समाजात बदल व्हावेत, परिवर्तन व्हावेत यासाठी ध्यास घेतलेले समाज सुधारक.
आपला देशही याबाबतीत अपवाद नाही. आपल्या देशात इतरांच्या तुलनेत शास्त्रज्ञ कमी झाले असले तरी समाजसुधारक मात्र आपल्याला वेळोवेळी लाभले आहेत. यासंदर्भात आपल्या देशातील दोन राज्ये भाग्यवान आहेत. महाराष्ट्र आणि बंगाल! म. गांधी तर ‘महाराष्ट्र म्हणजे सुधारकांचे मोहोळ आहे’ असा महाराष्ट्राचा गौरव करीत. आपले आणखी भाग्य म्हणजे आपल्याला लाभलेली देदीप्यमान अशी संत परंपरा. या परंपरेने भक्तीचा प्रसार करताना महाराष्ट्राच्या एकूणच समाज प्रबोधनालाही हातभार लावला आहे हे कुणीही नाकारणार नाही. मोजकीच उदाहरणे द्यायची तर सातशे वर्षांपूर्वी जातीभेद प्रचंड. कडक उन्हाळा असताना एकनाथ महाराज उन्हात रडणारे अंत्यजाचे पोर बिनधास्तपणे कडेवर घेतात तर आम्हाला देव-देवता वश आहेत अशी शेखी मारणाऱयांना ‘मग का मरती तयांची पोरे’ असा रोकडा सवाल ज्ञानोबा करतात. नवसाची खिल्ली उडवताना तुकोबा म्हणतात, ‘ऐसे नवसाये कन्या पुत्र होती तर का कारणे करावा लागे पती’ असा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात काम करणाऱया कार्यकर्त्याने विचारावा असा प्रश्न विचारतात. अगदी अलीकडचे गाडगेबाबा नखशिखांत सुधारकी प्रकृतीचेच होते. हे सगळे जरी खरे असले तरी एकूणच प्रबोधन किंवा नेमकेपणाने बोलायचे तर अंधश्रद्धा निर्मूलन या कार्याला जुंपून घेणे म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱया भाजणे. पण फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही प्रबोधनाची भूमी पडिक राहणे तसे शक्यही नव्हते आणि योग्यही नव्हते. म्हणूनच की काय समाज प्रबोधन करणाऱया संस्थांची महाराष्ट्राला वानवा कधीच पडली नाही.
अशीच एक संस्था गेली 35 वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कार्य करीत आहे, ती म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती! नुकतेच या संस्थेचे आळंदी येथे तीन दिवसांचे अधिवेशन पार पडले. एक हजार क्षमता असलेले सभागृह तुडुंब भरलेले होते. चार्वाक, बसवेश्वर, जोतिबा-सावित्रीबाई, आगरकर तर अगदी प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे दिवसेंदिवस अंधश्रद्ध होत चाललेल्या समाजात किती निकडीचे आहे याची प्रखरतेने जाणीव या अधिवेशनात झाली. अंधश्रद्धेचे दुखणे दूर करताना आत्मिक समाधानासाठी सामान्यजनांना देव आणि धर्म यांचा आधार वाटतो हे सत्यही नाकारले गेले नाही. असे असले तरी सर्व समाज सुधारकांना जसे विरोधी विचारांच्या निखाऱयावरून चालावे लागते त्याला ही संस्थाही अपवाद नाही, हे संस्थेची पस्तीस वर्षांची वाटचाल पडद्यावर तिथे दाखवली गेली त्यावरून सिद्ध झाले. खरे तर विरोधी विचारांचा समाचार घेताना तो आदरपूर्वक घेण्याची आपली परंपरा आहे म्हणूनच आपल्या संस्कृतीत ‘वादविवाद सभा’ नित्याने व्हायच्या. याचे कारण म्हणजे ‘वादे वादे जायते तत्वबोधः’ हे तत्त्व आपल्या समाजाने जाणीवपूर्वक जपलेले आहे.
चिकित्सेचे आपल्याला केव्हाही वावडे नव्हते. म्हणूनच परधर्मीय परकीयांची एवढी आक्रमणे होऊनही हिंदू धर्म दुबळा झाला नाही. विरोधी विचारांची, चिकित्सेची महती तुकोबा तर वेगळय़ाच शब्दात सांगतात, ते म्हणतात ‘निंदकाचे घर असावे शेजारी’! इथे निंदा या शब्दाचा अर्थ टीका करणारा, चिकित्सेचा आग्रह धरणारा असा आहे.
समाज परिवर्तनाचे कार्य करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे आहे. तरीदेखील सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेली मंडळी या डोहात उडी घेतातच, अन्यथा आपला उत्तम चाललेला वैद्यकीय व्यवसाय सुविद्य पत्नीच्या हवाली करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात उडी घेतली नसती. अंधश्रद्धेच्या या दलदलीत उतरताना त्यांनी स्वतः एक पथ्य पाळले आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही पाळावयास सांगितले ते म्हणजे ‘अंधश्रद्धा निर्मूलनच काय, पण एकूणच समाज परिवर्तन करताना, क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते’! समाजबांधवांबद्दल कणव असल्याशिवाय अशी मनोधारणा होत नाही. सौम्य प्रकृतीच्या डॉ. दाभोलकरांना ‘गुप्ते तिथे खुपते’ या कार्यक्रमात श्री. अवधूत गुप्ते यांनी प्रश्न केला होता की, तुम्ही आणि तुमची समिती इतकी वर्षे काम करूनही समाजातील अंधश्रद्धा नष्ट झाल्याचे दिसत नाही.’ त्यावर डॉ. दाभोलकर उत्तरले होते की, ‘पाच हजार वर्षांपासून चालत आलेल्या अंधश्रद्धा पन्नास वर्षांत कशा नष्ट होतील? त्यातून मी उक्रांतीवादी आहे क्रांतीवादी नाही. समाजाला चुचकारीतच पुढे जावे लागेल.’
या अधिवेशनात एक दिलासादायक निर्वाळा वारकरी पंथातील तीन अध्वर्यूनी म्हणजे शामसुंदर सोन्नर महाराज, चोपदार महाराज आणि ज्ञानेश्वर बंडगर यांनी दिला. तो म्हणजे अनिस ही संस्था संतांचेच कार्य पुढे नेत आहे यापेक्षा आणखी काय हवे? सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करताना विज्ञानाचा आधार घ्यावाच लागतो. कारण अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक सत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा हे कार्य करीत असताना आपोआपच समाजात विज्ञानाची पखरण होते की जी आपल्या विकसनशील देशाला अत्यंत मोलाची ठरणार आहे!!