सत्याचा शोध – श्रेष्ठ संस्कृतीच्या पाऊलखुणा

>> चंद्रसेन टिळेकर

स्वयंस्फूर्तीने कायदा पालन, सार्वजनिक स्वच्छता, सामुदायिक शिस्त, बुद्धिप्रामाण्याचा वसा ही सर्व जीवनमूल्ये म्हणजेच श्रेष्ठ संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत. परंतु ही जीवनमूल्ये, सामाजिक मूल्ये जपण्यात, पाळण्यात आपण भारतीय अपयशी ठरलो आहोत.

देश, धर्म अन् संस्कृती या प्रत्येक समाजाच्या दृष्टीने जिवापाड जपण्याच्या गोष्टी असतात. म्हणूनच या गोष्टींच्या संदर्भात कोणी चिकित्सा करण्याचा, दोष किंवा त्रुटी दाखविण्याचा प्रयत्न केला तर तो सहजासहजी खपवून घेतला जात नाही. आमच्या लहानपणी तर आपली संस्कृती जगात श्रेष्ठ आहे, असे आम्हाला अधूनमधून मोठय़ा माणसांकडून ऐकवले जायचे. परंतु पुढे शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने इतर देशांतील समाजाशी आपला जेव्हा संबंध येतो तेव्हा आपलीच संस्कृती जगात श्रेष्ठ आहे ही केवळ अंधश्रद्धा होती की काय असे वाटायला लागते. मग आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे श्रेष्ठ संस्कृतीची लक्षणे तरी कोणती? एखादा समाज या पृथ्वीतलावर खूप प्राचीन असेल तर त्याची संस्कृती किंवा एखादा समाज संख्येने मोठा असेल तर त्याची संस्कृती श्रेष्ठ मानावी काय?

खरे सांगायचे तर प्रत्येक हिंदुस्थानीला जगात आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे असे गुणगान करायला आणि ऐकायलाही मनापासून आवडते. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी नाही असे शांत डोक्याने विचार केल्यावर आणि जगातल्या काही देशांत संचार केल्यावर आपल्याला म्हणावे लागते. यासंदर्भात सावरकरांचा ‘दोन शब्दांत दोन संस्कृती’ या शोध निबंधाची प्रकर्षाने आठवण होते. आपल्या निबंधात आपल्या हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य संस्कृतीची तुलना करताना ते म्हणतात, आपली हिंदुस्थानी संस्कृती स्मृती, श्रुती, पुराणोक्त म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीची तर पाश्चात्त्यांची अप-टू-डेट म्हणजे आधुनिक! साधी बूट पॉलिशची डबी घ्यायची असेल तरी तेथील दुकानदार आपल्यापुढे खास डबी पुढे करेल आणि म्हणेल, “साहेब, हीच डबी घ्या. कारण ही अप-टू-डेट आहे!’’ सावरकर पुढे म्हणतात, “ते भोत्ते आधुनिकतेचे, आम्ही पुराणकाळाचे!’’ अप्रत्यक्षरीत्या सावरकर पाश्चात्त्य संस्कृतीची भलामण करत आहेत हे कुणाच्याही लक्षात येईल.

शांत चित्ताने आपण श्रेष्ठ संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधत गेलो तर काही चटकन ठळक अशा खुणा आपल्या समोर ठाकतात. उदा.स्वयंस्फूर्तीने कायदा पालन, सार्वजनिक स्वच्छता, सामुदायिक शिस्त, बुद्धिप्रामाण्याचा वसा इत्यादी. ही सर्व जीवनमूल्ये कसोशीने सांभाळण्याचा प्रयत्न आपल्याला पाश्चात्त्य समाजात दिसून येतो.सामुदायिक शिस्त तर त्यांच्या अंगात इतकी भिनलेली असते की, दोन माणसे आली तरी ते रांग करतात. तसेच कोणी कितीही घाईत असो, तो रस्त्यावरचा सिग्नल तोडून कधीही पसार होत नाही. जर्मनीच्या एका चौकात संध्याकाळचे आम्ही पती-पत्नी आलो असता चारी बाजूने एकही वाहन दिसत नव्हते, परंतु जर्मन नागरिक मात्र श्रध्दांजली वाहताना जशी माणसे पुतळ्यासारखी स्तब्ध उभी असतात तसे उभे होते आणि इंडिकेटरवर जाण्याचा इशारा मिळाला तेव्हाच त्यांनी पाऊल उचलले. मला आपल्या देशातील, विशेषतः पुण्यातील वाहतूक आठवली. पुण्यात हिरवा सिग्नल पडल्यावर जेवढी वाहने क्रॉस करतात त्यापेक्षा जास्त वाहने लाल सिग्नल पडल्यावर करतात. `No Entry’त वाहन घुसविण्यात काय पुरुषार्थ असतो हे पाश्चात्त्यांनी आम्हा हिंदुस्थानींपासून शिकावे हेच खरे.

आमच्या सामाजिक स्वच्छतेबद्दल तर न बोललेलेच बरे! पाश्चात्त्य देशांतील रस्ते एवढे स्वच्छ की खुशाल मांडी घालून रस्त्यावर जेवायला बसावे.

चालता चालता रस्त्यावर पचकन थुंकण्याची कला गोऱया लोकांना अवगत नाही हेच खरे ! ते या कृतीबद्दल एवढे अनभिज्ञ होते की, इथे राज्य करायला आल्यावर त्यांनी असंख्य हिंदुस्थानीयांना पानांची लाल पिचकारी मारताना पाहून ‘हिंदुस्थानी रस्त्यात रक्ताची उलटी करतात’ असे स्वदेशी कळवले होते.

त्यांची सार्वजनिक Toilets म्हणजेच स्वच्छतागृहे नावाप्रमाणेच स्वच्छ असतात. याउलट आपल्या देशातील सार्वजनिक स्वच्छतागृहे नावालाच स्वच्छ असतात.

वेळेची शिस्त पाळणे हे जर एक श्रेष्ठ संस्कृतीचे लक्षण असेल तर त्याबाबतीत आपण अवलक्षणी आहोत हे मान्यच केले पाहिजे.जपानमध्ये म्हणे ट्रेन ठरल्या वेळेपेक्षा दोन मिनिटे जरी उशिरा आली तरी तिथे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना भरपाई देण्यासाठी रेल्वेचा अधिकारी उपस्थित असतो. हा आदर्श आपण अंगीकारण्याचे ठरवले तर आपल्याला आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात मोठा संकल्प करावा लागेल.

वेळेवर जाणे, हजर राहणे यात पुढाऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य हिंदुस्थानीयांनाही कमीपणा वाटतो. आपले कुठलेही कार्य वेळेवर सुरू होत नाही आणि वेळेवर संपत नाही. चीनसारख्या पौर्वात्य देशातही सार्वजनिक प्रकल्प केव्हा सुरू होणार आणि कोणत्या तारखेला संपणार हे जनतेसाठी मोठय़ा फलकावर निर्देश केलेले असते आणि तिथेही ठरल्या वेळीच ते प्रोजेक्ट पूर्ण होते.

श्रेष्ठ संस्कृतीसाठी बुद्धिप्रामाण्याची कसोटी लावायची म्हटली तरी त्या बाबतीतही आपल्याकडे आनंदीआनंद आहे असेच म्हटले पाहिजे. कारण आपण पुराणकाळात रमणारे आहोत हे कोणीही मान्य करील. आपल्याला विज्ञानाचे फारसे वावडे नसले तरी गोडीही नाही. शेकडो वर्षे आपण अध्यात्माचीच तळी उचलत आलो आहोत. ‘जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते’ हे आपले आवडीचे सुवचन आहे. अगदीच कोणी यासंदर्भात खनपटीला बसला तर ‘विज्ञानावाचून अध्यात्म पांगळे आहे आणि अध्यात्मावाचून विज्ञान लंगडे आहे’ अशी कबुली देऊन मोकळे होतो. परंतु आपल्या हिंदुस्थानीयांचे एक ठळक लक्षण आहे आणि ते म्हणजे, आम्ही पोळी विज्ञानाची खातो, पण टाळी मात्र अध्यात्माची वाजवतो! हा अनुभव आपण सर्वांनी कोरोना काळात घेतलाय. एकजात सारे देव कडीकुलुपात बंदिस्त होऊन पडले होते आणि आपण विज्ञान केव्हा परिणामकारक लस शोधतेय याची वाट पाहत बसलो होतो. गंमत म्हणजे, कोरोना आटोक्यात येताच आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी धाव घेतली आणि त्या साथीमधून देवाने वाचवले असे सोयिस्कररीत्या समजूत करून घेऊन पूजाअर्चेत दंग झालो.

आपण आपल्या मनासारखे जीवन जगत असता आपल्यामुळे इतरांना कसला त्रास तर होत नाही ना, याची काळजी घेणे हेदेखील सुसंस्कृतपणाचे एक लक्षण आहे, पण सण, उत्सवप्रसंगी आपण नेमके हे विसरतो आणि ध्वनी, वायू किंवा दुसऱया कुठल्याही प्रदूषणाची चिंता न करता आपल्याला तेवढा आनंद कसा होईल याचाच आम्ही विचार करतो. सामाजिक बांधीलकी जपणे हेही एक महत्त्वाचे जीवनमूल्य आहे आणि तेही श्रेष्ठ संस्कृतीचे लक्षण आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण सारे म्हणू ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’!

[email protected]