
चंद्रपूरचे तापमान बघितलं की सूर्य देवाचा मुक्काम चंद्रपुरातच असल्याचं वाटतंय. उकाडा आणि उष्णतेने नागरिक हैराण झालेले आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यावर शुकशुकाट आहे. एसी, कुलर काम करे ना अशी स्थिती जिल्ह्यात आहे. अशात एक गाव मात्र हंडाभर पाण्यासाठी सूर्य डोक्यावर घेऊन निघतो. पाणी तरी कुठलं, तर नाल्यातील. नाल्यातील झोंबणाऱ्या रेतीतून वृद्ध लहान बालके पाण्यासाठी घाम गाळतात.
देशात नव्हे तर जगात चंद्रपूरचे तापमान नंबर वन ठरले आहे. जिल्हा प्रशासन खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहे. घरात थांबायचं तर मग तहान कशी भागवायची, हा साधा प्रश्न गावकरी करतात. पाणी द्या, ही गावाची आर्त हाक प्रशासनाला ऐकू जात नाही ही मोठी शोकांतिका. जिल्ह्यातील हेटी नांदगाव हे गाव गोंडपिपरी तालुक्यात येतेय. गावात विहीर आहे मात्र विहिरींनी तळ गाठला आहे. नळ योजना आहे मात्र नळांना पाणी नाही.अशी बिकट अवस्था गावाची झाली. अश्या स्तिथीत गावकरी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात असलेल्या खड्ड्यातील पाण्याने तहान भागवतात.
एक हंडा पाणी भरायला किमान अर्धा तास लागतोय.या खड्ड्याचा भोवती महिलांची मोठी गर्दी असते. अगदी पहाटेपासून गावकरी पाण्यासाठी नाल्यात उतरता. रखरखत्या उन्हातही त्यांचे पाणी भरणे सुरूच असते. कुटुंबातील वृद्ध, लहान मुले पाणी नाल्यावर गोळा होतात आणि पाणी वाहून नेतात. इथं पिण्यासाठीच पाणी नाही. अश्यात गावातील अनेकांना घरकुल मंजूर झाली आहेत. घर बांधकामासाठी अनेकांनी नाल्यातच खड्डा मारलेला आहे. तर काही घरकुल लाभार्थी बैलगाडीने पाणी आणतात. दरवर्षीच या गावाला पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. मात्र या गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.