महावितरणचा प्रताप! वीज नाही, मीटर नाही… तरी शेतकऱ्यांना आले साडे पाच हजाराचे बिल

>> अभिषेक भटपल्लीवार

विद्युत मीटर मागायला गेलेल्या शेतकर्‍यांच्या हातात महावितरणने थेट विजेचे बिल ठेवले. अद्याप मीटर बसलेला नसताना थेट हातात बिल बघून शेतकऱ्यांना शॉक बसला. महावितरणचा हा पराक्रम जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात घडला आहे.

चेक लिखितवाडा हे लहानसं गाव आहे. या गावातील शेतकरी मुरलीधर शेंद्रे, भाऊजी सीताराम कोलांडे या दोन शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवर विद्युत मीटर बसाविण्यासाठी महावितरणकडे रीतसर डिमांड भरला. वर्ष लोटलं पण विद्युत मीटर काही येईना. अखेर शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय गाठले आणि मीटर बसवण्यासाठी विलंब का होत आहे याचा जाब विचारला. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तर दिलीत. मात्र दुसऱ्या दिवशी या दोन्ही शेतकऱ्यांना पाच हजार पाचशे रुपयाचे विदयुत बिल पाठविण्यात आले. या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप विद्युत खांब गेलेले नाहीत. मीटर बसलेला नाही. त्यामुळे विद्युत देयक बघून दोन्ही शेतकरी चक्रावले. दुसरीकडे विद्युत देयक भरावेच लागेल असा तगादा महावितरणने लावला आहे. मागील तीन महिन्यापासून आलेलं देयक रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे.

”राज्याचा अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरतुदी केल्या आहेत. मात्र शासनाच्या योजना राबवणारे कर्मचारी योजनांना कसे पायाखाली तुडवतात, याचे उत्तम उदाहरणं या दोन शेतकऱ्यांची पायपीट आहे, असे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सांगितले. तसेच या दोन शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर फुसे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.