चंद्रपूर जिल्ह्यातील वाघिणी आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहेत. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात होत्या. ओडिशाच्या जंगलात पाठवण्यासाठी निश्चित केलेल्या वाघिणीपैकी एक वाघीण पकडुन आज रवाना करण्यात आली. T158 क्रमांकाची ही वाघीण ताडोबाच्या खडसंगी – नवेगाव या बफर क्षेत्रातून पकडण्यात आली. तिचे वय अडीच ते तीन वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकूण तीन वाघिणी ओडिशाच्या सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात पाठवायच्या आहेत. त्यातील पहिली वाघीण आज रवाना करण्यात आली. ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या कमी आहे. त्यामुळे ओडिशा राज्य सरकारने प्रजनन आणि ओघानेच वाघांच्या वाढीसाठी वाघिणींची गरज NTCA कडे नोंदवली. त्यानुसार ही गरज आता चंद्रपूर जिल्ह्यातून भागवली जात आहे. दोन वाघिणी पाठवायच्या असल्या तरी शोध अनेक वाघिणींचा घेतला जात होता.
ताडोबा कोअर, बफर आणि संरक्षित जंगलात हा शोध सुरू आहे. आज T158 क्रमांकाची वाघिण पकडण्यात आली आणि लगेच त्या वाघिणीला ओडिशाला रवाना करण्यात आले. यापूर्वीही अशारीतीने इथले वाघ राज्यात इतरत्र पाठवण्यात आले, पण ते वाघ प्रामुख्याने हल्लेखोर होते. यावेळी मात्र इथे रमलेल्या वाघिणी पकडल्या जात असून ओडिशासारख्या दूरवरच्या राज्यात सोडल्या जात आहेत, त्यामुळे ओडिशा वन विभागाची जबाबदारी वाढली आहे.