102 ची रुग्णवाहिका चक्क लग्नसमारंभात उभी; शिवसैनिक भडकले, आंदोलन छेडलं, प्रशासनाची पळापळ

ambulance

102 रुग्णवाहिकेचा खासगी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात पुढे आला आहे. रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध न होणारी 102 रुग्णवाहिका लग्न समारंभात दोन तास उभी असल्याचा प्रकार समोर आला. शिवसैनिकांनी लग्न समारंभात दोन तास उभी असलेली रुग्णवाहिका पाहताच संतप्त झाले आणि त्याप्रकरणी जाब विचारला. यानंतर प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हप्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात रुग्णालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले.

चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका क्र. MH34BG9985 रविवारी चिमूर शहराजवळील मासळ मार्गांवरील A 1 रीसॉर्टच्या समोर गाड्यांच्या रांगेत तब्बल दोन तासांपासून उभी असल्याचे अनेकांनी बघितले. हा प्रकार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसैनिकांच्या निदर्शनास आला. या रुग्णावहिकेत वैद्यकीय अधिकारी, सोबत सात ते आठ कर्मचारी होते. हे लोक रुग्णवाहिकेतून उतरून थट लग्न समारंभात दाखल झाले. जवळपास दोन तास रुग्णवाहिका तिथेच उभी होती. हा सारा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केलं.

या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे. कारवाई न केल्यास मोठ आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत कोल्हे यांनी दिला आहे. या प्रकाराने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. खासगी कामासाठी रुग्णवाहिकेचा वापर करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभाग काय कारवाई करतेय याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.