
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. आजही मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 600 हून अधिक घरांची पडझड झाली असून शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून नागभीड-नागपूर महामार्ग पुराच्या पाण्यामध्ये बंद पडला होता. तसेच अनेक गावं, वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्तेही नदी, नाल्यांना पूर आल्याने बंद पडले होते. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर हे मार्ग सुरू झाले.
मुसळधार पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरं आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मुसळधार पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथे घराची भिंत कोसळून पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नागभीड तालुक्यातील विलंब या गावचा 10 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला आहे. रोनाल्ड पावणे असे मुलाचे नाव आहे. तर बोथली येथील नाल्यात बुडून स्वप्निल दोनेडे याचा मृत्यू झाला. स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला अति मुसळधार ते मुसळधार, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जावना, परभणी शहरांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.