![chandrapur news](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/chandrapur-news-696x447.jpg)
आपल्या देशातून दत्तक प्रक्रियेद्वारे अनेक बालकं विदेशातील दाम्पत्य दत्तक घेतात. पण जन्मत: व्यंग असलेले बालक दत्तक घेण्याचे धाडस कुणी करत नाही. मात्र एका स्विडीश दाम्पत्याने हे धास दाखवले आहे. चंद्रपूरमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत स्विडीश दाम्पत्याला बाळ दत्तक दिले.
जन्मत: व्यंग असलेल्या बालकाला त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांनी नाकारले होते. मात्र स्वीडन येथील निपुत्रिक दाम्पत्याने या बालकाचा स्वीकार केला. दत्तक प्रक्रिया पार पाडण्याची हे दाम्पत्य चंद्रपूरमध्ये पोहोचले. चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने सदर बालकाची कायदेशीर दत्तक प्रक्रिया पार पाडली. यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी एक दत्तक समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमातच बालकाला स्वीडन येथील रिकार्ड टोबायस हेडबर्ग आणि मारिया एलिझाबेथ व्हिक्टोरिया एरिक्सन या दाम्पत्याकडे सोपवण्यात आले.
चंद्रपुरात बालविकास विभागाच्या वतीने आजवर गेल्या 15 वर्षात जवळपास 300 दत्तक विधाने झाली आहेत. यातील 260 बालकांना देशांतर्गत तर 27 बालकांना परदेशात दत्तक दिले गेले आहे.