Chandrapur news – हजारो किलोमीटरचा प्रवास करून इरई धरण परिसरात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी हिवाळ्यात परदेशी पाहुणे हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध जलाशयांवर हजेरी लावतात. युरोप, मध्य‌ आशिया, सायबेरिया, मंगोलिया, रशियासह उत्तरेकडून अर्थात हिमालय, जम्मू-कश्मीर, लडाख येथूनही पक्षी चंद्रपुरात येतात. तसेच हिवाळ्यात या भागात कडाक्याची थंडी असल्याने पोषक आहार, प्रजनन आणि पिल्लांच्या संगोपनासाठी पक्षी स्थलांतर करत चंद्रपुरात येतात. यंदाही जिल्ह्यातील विविध लहान-मोठ्या जलाशयांवर स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उत्तरेकडील भागासह विदेशात हिवाळ्यात बर्फ पडण्यास सुरुवात होते. तलाव, सरोवर, नद्या आदी पाणवठे गोठून जातात. वृक्षांचीही पानगळती होते. त्यामुळे पक्ष्यांना झाड, जमीन व तलावात मिळणाऱ्या अन्नाचं दुर्भिक्ष जाणवते. म्हणून हे पक्षी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. हजारो किलोमीटर प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात येतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. तसेच वन, उद्यान, शेतपीक आणि कुरणं आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात गवत, विविध प्रकारची वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, जलचर, उभयचर यांची संख्या वाढल्याने खाद्य उपलब्ध असते. म्हणूनच आक्टोबर महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पक्षी स्थलांतरीत व्हायला सुरुवात होते. त्यानंतर 4 महिने मुक्काम केल्यानंतर हे पक्षी फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात.

यंदाही इरई धरण व आजुबाजूच्या परिसरात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन झालेले आहेत. 8000 मीटर उंचीवरून सुमारे 4000 कि.मी.चा प्रवास करत बार हेडेड गूजचे (पट्टकादंब हंस) आगमन झाले आहे. हा जगातील सर्वात उंच उडणारे पक्ष्यांपैकी एक असून तो हिमालय पर्वत ओलांडून हिंदुस्थानात स्थलांतर करत दाखल झाला आहे.

यावर्षी चंद्रपुरातील इरई धरण परिसरात स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये बार हेडेड गूज (पट्टकादंब) या पक्षाचे जवळपास 24 पक्ष्यांचा थवा आढळून आला आहे. सोबतच रुडी शेलडक (चक्रवाक), क्वाटन टील (काणुक बदक), गडवाल (मलिन बदक), नो्र्दन पिन्टेल (तलवार बदक), गार्गेनी (भुवयी बदक), को्म्ब डक (नकटा बदक), क्आमन टिल (चक्राग बदक) व रेड क्रिस्टेट पोचार्ड (मोठी लालसरी) हे पक्षीही आढळून आले आहेत. मोठी लालसरी आणि काणुक बदकही मोठ्या संख्येने आढळून आले आहेत.