Chandrapur News : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच नाही; संतप्त विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेमुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला पळ

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेवर धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेमुळे समजूत काढण्यासाठी आलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना तिथून पळ काढावा लागला.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळा सुरू होऊन आठ दिवस उलटले, तरी शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वणवा आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतं थेट जिल्हा परिषदेवर आपला मोर्चा वळवला. विद्यार्थ्यांसमवेत पालक सुद्धा सामील झाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यलयापुढे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. प्रामुख्याने नवेगार मोरे, चक निंबाला, विसापूर आदी गावांमधून हे विद्यार्थी आले असून शिक्षकांची पुर्तता करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमकतेमुळे त्यांची समजूत काढण्यासाठी शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे आल्या होत्या. मात्र विद्यार्थी आणि पालकांनी त्यांची व्यथा मांडताच त्यांनी तिथून पळ काढला. त्यामुळे प्रशासनाकडे उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून जात असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केला. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसमवेत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.