
नियम डावलून उत्खनन करणाऱ्या कर्नाटक पॉवर कंपनीला कोळसा उत्खनन बंद करण्याच आदेश देण्यात आले आहेत. वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत लागू करण्यात आलेल्या काही नियम व अटींचे उल्लंघण केल्यामुळे नागरिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
नियम डावलून उत्खनन करणाऱ्या कर्नाटक पॉवर कंपनीचे कोळसा उत्खनन आजपासून बंद करण्यात आले. चार दिवसांपूर्वी वन विभागाने KPCL कंपनीला उत्खनन बंद करण्याचे आदेश दिल्याने कंपनी प्रशासनात खळबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कंपनीला वन विभागाकडून 84.41 हेक्टर जमीन मिळाली होती. ही जमीन देताना वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत काही नियम व अटी लागू केल्या. मात्र या नियमांना डावलून कंपनीने अवैध कोळसा उत्खनन सुरू केले होते. याबाबत नागरिकांकडून वन विभागाकडे तक्रारी केल्या गेल्या. याची गंभीर दखल वन विभागाने घेतली. त्यानंतर मोका पंचनामा करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता. यात अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे खाण बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जोपर्यंत वन विभागाच्या अटी व शर्तीची पूर्तता होत नाही, तोपर्यंत KPCL खाण बंद राहणार आहे. अटींचे उल्लंघन केल्यामुळे एखादा प्रकल्प बंद करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.