शेतात खतांची फवारणी करताना विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज झिंगरे, पुंडलिक मानकर (रा. चिखेडा) अशी मृतांची नावे आहेत, तर सचिन नावाचा शेतकरी जखमी झाला आहे. त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रकाश राऊत यांच्या शेतामध्ये पिकाला फवारणी करण्यासाठी आले होते. याचवेळी विजेच्या तुटलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. स्पर्श होताच पाचही जण जागेवर कोसळले. शेतमालक प्रकाश राऊत यांच्यासह चौघांचा यात मृत्यू झाला, तर एक जखमी झाला.