मारकवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची देशभर चर्चा असताना चंद्रपुरात कृषी महोत्सवात पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेची चांगलीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे. जनतेच्या मनात आजही बॅलेट पेपरवरील विश्वास कायम असल्याने सर्व निवडणुका या बॅलेटवर घ्याव्यात अशी आशा मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली.
धनोजे कुणबी समाजाकडून तीन दिवशीय कृषी महोत्सवाचे आयोजन शहरातील चांदा क्लब ग्राऊंडमध्ये करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघ यांच्या संकल्पनेतून ‘आवाज जनतेचा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे का? असा प्रश्न मतदारांपुढे ठेवण्यात आला व त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. तीन दिवस सुरू असलेल्या या मतदानाची मतमोजणी झाली व जनतेचा विश्वास बॅलेट पेपरवरच आहे हे सिद्ध झाले.
या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून खुशाल काळे, प्रवीण एकोणकर यांनी कार्य केले. मतमोजणी अधिकारी म्हणून अॅड. विलास माथनकर, अनिकेत दुर्गे, वाल्मीक यांनी काम बघितले. मतमोजणी झाल्यानंतर उपस्थितांपुढे अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांचे या उपक्रमाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे. आवाज जनतेचा या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरातील मतदारांनी बॅलेटच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे यापुढे प्रत्येक गावात आवाज जनतेचा उपक्रम राबविण्यात येईल. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी जनआंदोलन करण्यात येईल, असे प्रा. अनिल डहाके यांनी सांगितले.
सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत का?
एकूण मतदान 5035
n होय 4614 (91.63 टक्के)
n नाही 356 (7.07 टक्के)
n नोटा 38 (0.75 टक्के)
n अवैध 27 (0.55 टक्के)