Chandrapur News – मुख्यमंत्र्यांची दोन खाती आपापसात भिडली; महावितरणने वीज कापली अन् पोलिसांनी चलान

चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन खाती आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. थकीत बिल न भरल्याने महावितरणने पोलील वसाहतीची वीज कापली, तर पोलीसांना कारवाईचा बडगा उभारत महावितरण अधिकाऱ्यांचे चलान कापण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ऊर्जा आणि गृह खात्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

चंद्रपूरात गृह विभाग अर्थात पोलिसांचे महावितरणचे 139 वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. या वीज कनेक्शनचे 81 लाखांचे वीज बिल थकीत आहे. मार्च अखेर असल्याने हे थकित बिल भरण्यासाठी महावितरणने रेटा लावला होता. मात्र बिल भरले न गेल्याने अखेर शहराच्या गिरनार चौकातील पोलीस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचे कनेक्शन महावितरणने कापले आणि यावरुनच दोन विभागातील भांडणाला सुरुवात झाली. पोलिसांनी सूड उगवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे एक भले मोठे पथक महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले आणि बाहेर निघणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे चालान कापण्यास सुरुवात केली. यामुळे भांबावलेल्या व घाबरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारा बाहेर एकच गर्दी केली. थकीत बिलापोटी पोलीस विभागवार कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीने पोलीस विभाग सूड घेत असेल, तर कायदा कुठे आहे? असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला. तर दुसरीकडे या सर्व अफवा असून अशा पद्धतीच्या मोहिमा आम्ही अनेक विभागात नेहमी राबवतो, असा पवित्रा पोलीस विभागाने घेतला आहे. पोलिसांनी एखाद्या गुंडा सारखी भूमिका घेतल्यानंतर घाबरलेल्या महावितरणने कापलेले एकमेव कनेक्शन पुन्हा जोडून दिले. मात्र थकीत बिल भरण्यात आलेले नाही हे विशेष.